राज्यांचे ब्रँडींग करताना कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग महत्वाचा : पीएम मोदी

👉जी 20 परिषद बैठका: पंतप्रधानांनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद 👉20 परिषद बैठकांसाठी मुंबई सज्ज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई : भारतात येत्या वर्षभरात होणाऱ्या जी 20 परिषदेच्या बैठका आणि कार्यक्रमांच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचे राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्रात दि. 12 डिसेंबरपासून जी 20 परिषदेच्या बैठकांना मुंबईत सुरूवात होणार असून त्यासाठी मुंबई शहर सजले आहे. राज्याची सांस्कृतिक परंपरा, खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवितानाच राज्यात गुंतवणुकीसाठी क्षमता असलेल्या क्षेत्रांची ओळख देखील परदेशी पाहुण्यांना करून दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

जगभरातील देशांमध्ये तिथल्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जी 20 परिषदेशी संबंधित सुमारे एक लाख लोक आपल्याकडे येत आहेत. त्यांच्यापर्यंत आपल्या राज्यांचे ब्रँडींग करण्याची सुवर्णसंधी असल्याचे पंतप्रधान श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले. भारतातील प्रत्येक राज्याचे नाव जागतिकस्तरावर निघाले पाहिजे, अशाप्रकारे आयोजन करा. त्यामध्ये समाजातील सर्वच स्तरातील लोकांचा सहभाग करून घ्या, असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.
आपल्या देशातील राज्यांची समृद्ध विविधता दर्शविण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगत महिलांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, आर्थिक आदी क्षेत्रात जो विकास झाला आहे, त्याचे दर्शन या बैठका आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून घडवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. जी 20 परिषद कार्यक्रमांच्या आयोजनातून सर्वांनी मिळून राज्यांची ताकद दाखविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
बैठका आणि कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी आपल्या राज्यांमधील विदेश सेवेत काम केलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांचा सहभाग करून घ्यावा. अन्य राज्यांनी केलेल्या आयोजनाच्या अभ्यासासाठी आपल्या राज्यातून अधिकाऱ्यांना पाठवावे. प्रत्येक राज्याने बैठका आणि कार्यक्रमांच्या काळात सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रीत करतानाच सामान्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पंतप्रधान श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान श्री. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जी 20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही सर्व देशवासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे. परिषदेच्या बैठकांसाठी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
यावेळी विविध राज्यातील मुख्यमंत्री यांनी आपापल्या राज्यात होणाऱ्या बैठका आणि कार्यक्रम यासंदर्भातील नियोजनाची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रास्ताविक केले तर केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी जी 20 परिषदेविषयी माहिती दिली.
👉परदेशी पाहुण्यांचे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार फेटे बांधून स्वागत
मुंबईत 13 ते 16 डिसेंबर याकाळात विकास विषयक कार्यगटाची बैठक होणार आहे. मुंबई शहराच्या सजावटीमध्ये कुठलीही उणीव भासू देऊ नका, असे सांगतानाच परिषदेसाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार फेटे बांधून स्वागत करावे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
पंतप्रधानांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना सूचना दिल्या. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबईची ओळख असलेले कोळी बांधव आणि त्यांचे पारंपरिक वेशातील कोळी नृत्याने पाहुण्यांचे स्वागत करावे. राज्याची खाद्यसंस्कृती, लोककला यांचे दर्शन घडवितानाच महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी संधी असलेल्या क्षेत्रांची ओळख देखील जी 20 परिषदेतील पाहुण्यांना झाली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जी 20 परिषदेच्या वर्षभरात सुमारे 215 विविध बैठका आणि कार्यक्रम होणार आहेत. त्यातील 14 बैठका महाराष्ट्रात होणार असून मुंबईत 8, पुणे 4, औरंगाबाद आणि नागपूर प्रत्येकी एक अशा बैठकांचे स्वरूप आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!