संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork अहमदनगर : वेतनवाढ कराराच्या प्रश्नावरून रविवारी अचानक एक्साईड कंपनीतील कामगारांनी बंद पुकारला आहे. यामुळे कंपनी प्रशासन व कामगारांमध्ये संघर्ष सुरू आहे. घाणेरड्या राजकारणामुळे कंपनी व्यवस्थापन प्लांट बंद करून नगर मधून अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या विचारात असल्याच्या पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. यामुळे कामगार, उद्योजकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीचे उत्पादन ठप्प झाले आहे. घाणेरड्या राजकीय हस्तक्षेपामुळे कंपनी कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित होऊ देऊ नका. कामगार बांधव व उद्योजकांचे शोषण थांबवा. यासाठी तातडीने लक्ष घाला, असे राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे तसेच उद्योग मंत्री व कामगार मंत्री यांना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी साकडे घातले आहे.
दरम्यान, काळे यांनी काल रात्री उशिरा कंपनी प्रशासनाच्या प्रतिनिधीं समवेत चर्चा करत यातून सामंजस्याने तोडगा काढून कामगार व कंपनी दोघांचे हीत जोपासणारा सुवर्णमध्य काढावा असे आवाहन केले आहे. काळे यांनी दोन्ही मंत्र्यांशी ईमेल द्वारे पत्रव्यवहार करीत राज्य शासनाचे लक्ष वेधले असून निवेदनात म्हटले आहे की, एक्साईड ही नगरच्या कामगार बांधव व लघु उद्योजकांची कामधेनु आहे. कंपनीवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सुमारे ५००० कामगार बांधव रोजी – रोटीसाठी अवलंबून आहेत. सन २००४ मध्ये स्थानिक राजकारण्यांच्या उपद्रवामुळे कंपनी कामकाज बंद करून शहरातून निघून गेली होती. हजारो कामगार बेरोजगार झाले होते. तशी परिस्थिती आज पुन्हा उद्भवते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
काळे यांनी प्रसार माध्यमांना नाशिक विभागाच्या कामगार उपायुक्त कार्यालयाचे पत्र उपलब्ध करून दिले आहे. या पत्रावर २ मे २०२२ अशी तारीख असून यावर उपनिबंधकांची स्वाक्षरी आहे. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय तापकिरे, सेक्रेटरी योगेश गलांडे असल्याचे म्हटले आहे. तर स्वराज्य संघटनेच्या लेटरपॅडचा उपयोग करत त्यावर राष्ट्रवादीचे मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर हे अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे आकाश दंडवते हे सेक्रेटरी असल्याचे दिसत आहे. या पत्रावर २५ जून २०२२ अशी तारीख असून कंपनी प्रशासनाला दिलेल्या यावर दोघांच्याही स्वाक्षरी आहे. कामगार आयुक्तांनी कामगार हिताच्या दृष्टीने नेमके खरे कायदेशीर पदाधिकारी कोण हे स्पष्ट करावे, अशी मागणी काळे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँगेसच्या कार्यकर्त्यांच्या मागे कुणाची ताकद आहे हे सर्वांना माहित आहे. शहरातील तरुण आज रोजगारासाठी पुणे, मुंबईचे उंबरे झीजवत आहेत. बनावट आयटी पार्कच्या माध्यमातून हजारो तरुणांची, पालकांची यापूर्वी फसवणुक झालेली आहे. शहर लोकप्रतिनिधी व त्यांच्या बगलबच्यांच्या त्रासाला कंटाळून जर एक्साईड शहर सोडून गेली तर अनेकांचे संसार उघड्यावर येतील. लघु उद्योग बंद पडून उद्योजक कर्जबाजारी होतील. अन्य कंपन्यांमध्ये देखील असाच राजकीय हस्तक्षेप, उपद्रव सुरू असून भविष्यात इतर कंपन्या देखील स्थलांतरित होण्याची भीती काळे यांनी व्यक्त केली असून एक्साईड सारखी आंतरराष्ट्रीयस्तरावरची कंपनी गेली तर भविष्यात कोणतीच कंपनी पुन्हा येणार नाही असे म्हटले आहे.
काळे यांनी जिल्हाधिकारी यांना देखिल लक्ष घालण्याची मागणी केली असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही पत्र पाठवत कंपनीत कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उचित कारवाई करावी असे म्हटले आहे. दरम्यान, एक्साईड प्रशासनाच्या वतीने डेप्युटी चीफ ऑपरेटिंग मॅनेजर संदीप मुनोत यांच्या स्वाक्षरीने कामगारांना नोटीस बजावून काम बंद आंदोलन तातडीने मागे घेत कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.