संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
‘राजकारण हा नगरचा ‘राष्ट्रीय खेळ’ आहे,’ असं गमतीनं म्हणतात. त्यात काहीसं तथ्यही आहे. प्रत्यक्ष खेळाच्या मैदानातही नगर काही मागं नाही. कबड्डी आणि क्रिकेटमध्ये अर्जुन पारितोषिकाचे मानकरी ठरलेले दोन खेळाडू याच जिल्ह्यातील आहेत – पंकज शिरसाट व झहीर खान. खो-खो आणि कबड्डी संघांचा राज्य पातळीवर दबदबा आहे. ज्युदो, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, कुस्ती या आणि अशा वैयक्तिक खेळातही नगरच्या अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय पातळीवर दखल घ्यायला लावली आहे. विशेषतः अलीकडच्या पंचवीस वर्षांत वैयक्तिक प्रकारात लक्षवेधक कामगिरी करणाऱ्या नगरच्या खेळाडूंची संख्या वाढली आहे. त्यामधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे यश अनिल शाह याने बॅडमिंटनच्या कोर्टवर चमकदार कामगिरी करीत, विविध गटांतील स्पर्धांमध्ये ‘यश’ मिळवित तो आपले नाव सार्थ करीत आहे.

यशचे वडील अनिल शाह नगरमधले उत्तम छायाचित्रकार. पण शालेय व महाविद्यालयीन जीवनात उत्तम खेळाडू ही त्यांची ओळख होती. वडिलांचा बॅडमिंटनचा वारसा यशमध्ये आला. वयाच्या सहाव्या वर्षीच त्याने हातात बॅडमिंटनची रॅकेट घेतली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तो खेळू लागला आणि त्याला त्याची गोडी लागलीव आई मयुरी ‘यश’ला संपूर्ण देशभर मॅचेससाठी नेणे-आणणे याचबरोबर त्याला’ पाचक अन्न व ज्युसेस देणे ( एनर्जी टिकविण्यास ) हि जबाबदारी सांभाळायची.
वडिलांप्रमाणेच श्री. मेहेर सर, राज्य मार्गदर्शक विशाल गर्जे, प्रसिद्ध बॅडमिंटनपटू उदय पवार पुणे येथे यश हा प्रथितयश कोच चैतन्य खानविलकर यांच्या कडे बॅडमिंटन चे धडे गिरवत असून फिटनेस चे कोचिंग महेंद्र तेहरणीकर यांच्याकडे घेत आहे. यांच्या मार्गदर्शनामुळे यशच्या खेळात सुधारणा होत गेली. नगरच्या शांतीभाऊ फिरोदिया मेमो. मॅक्सिमस अकादमीत त्याने सराव केला. बॅडमिंटन हा शारीरिक आणि मानसिक कसोटी घेणारा खेळ आहे. वयानुरूप यश एक-एक टप्पा सर करीत गेला. पंधरा, सतरा आणि एकोणीस वर्षांखाली गटांमध्ये तो नगर जिल्ह्याचा अजिंक्यवीर ठरला. एकेरी आणि दुहेरी स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवित, त्याने आगेकूच चालू ठेवली. आपल्याला उत्तम बॅडमिंटन खेळाडू व्हायचं आहे, हे त्यानं ठऱवलं होतं. वडिलांचा पाठिंबा आणि दर्जेदार प्रशिक्षण यांमुळे त्याच्यातील खेळाडू घडत गेला.

मनोरंजनासाठी किंवा शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळणे आणि स्पर्धात्मक पातळीवर खेळणे, यामधला फरक यशने लहान वयातच ओळखला. स्पर्धेचा निकाल काही लागो, खेळायचे असते ते जिंकण्यासाठीच, हा बाणा त्याने स्वतःमध्ये रुजवला. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने मोठी झेप घेतली, ती राष्ट्रीय स्पर्धेत खेळून.आंध्र येथे २०१५मध्ये झालेल्या १५ वर्षांखालील गटाच्या स्पर्धेत तो एकाच वेळी एकेरी व दुहेरी स्पर्धेसाठी पात्र ठरला. पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून त्याने अखिल भारतीय पातळीवर बावीसावे स्थान पटकावले.

लहान वयातच यश खेळाकडे गांभीर्याने पाहतो आहे आणि त्याला अधिक चांगली संधी मिळाली पाहिजे, या हेतूने त्याच्या पालकांनी त्याच वर्षी एक मोठा निर्णय घेतला. तो पुणे जिल्ह्याचा नोंदणीकृत खेळाडू झाला. त्या वर्षी (२०१६) सतरा वर्षांखाली गटात पुणे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत त्याने एकेरीची उपान्त्य फेरी गाठली. दुहेरीत तो उपविजेता ठरला. नाशिकच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याची पुणे जिल्हा संघामध्ये निवड झाली. हा संघ राज्य स्पर्धेत उपविजेता ठरला. त्या वर्षात यशला विजेतेपद मिळाले नसले, तरी त्याने आपला ठसा उमटवला हे निश्चित. राज्य स्पर्धेत एकेरी व दुहेरीमध्ये त्याने उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली. त्याच वर्षी एकोणीस वर्षांखालील गटात एकेरी व दुहेरीमध्ये त्याने ह्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली. ॲमनोरा पुणे स्पर्धेत सतरा वर्षांखालील गटाच्या दुहेरीत त्याची जोडी अजिंक्य ठऱली.
नगरचा खेळाडू पुणे जिल्हा संघाचा कर्णधार! कोणाचाही सहज विश्वास बसणार नाही, अशी मजल यशने २०१७मध्ये मारली. पुणे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात अजिंक्यपद मिळविल्याने नागपूर येथील राज्य स्पर्धेसाठी पुणे संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे सोपविण्यात आले. त्यात संघ उपविजयी ठरला. त्या वर्षीची त्याची कामगिरी पाहण्यासारखी आहे – परभणी – राज्य शालेय स्पर्धेत याच गटात उपान्त्य फेरी व दुहेरीत विजेतेपद. कराड राज्य स्पर्धा – एकेरीत उपविजेता व दुहेरीत विजेता. नागपूर – एकेरी व दुहेरीमध्ये उपविजेतेपद. या कामगिरीमुळे आसाममध्ये झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची राज्याच्या संघात निवड झाली.
एव्हान यशचे आणि बॅडमिंटनमधील यशाचे समीकरण चांगले जुळून आले होते. ते पाहायला मिळाले २०१८मध्ये. ठाण्यात झालेल्या राज्य स्पर्धेत त्याने पुणे जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व केले. रत्नागिरी झालेल्या राज्य स्पर्धेत यश व तनिष्का देशपांडे ही जोडी उपविजेती ठरली. राजमुंद्री येथे झालेल्या पश्चिम विभाग अजिंक्पयपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात यश होता.
यश एकोणीस वर्षांखालील गटात खेळू लागला आणि गंमत म्हणजे २०१९ वर्षात त्याची कामगिरी अधिकच लक्षवेधी झाली. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत त्याने एकेरीत विजेतेपद, दुहेरीत दोनदा विजेतेपद मिळविले. पश्चिम विभागीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या संघात तो होता.
कोविडच्या महामारीमुळे मध्यंतरी दोन वर्षे स्पर्धाच झाल्या नाहीत. स्पर्धा नसल्या तरी यशने सराव चुकवला नाही. मैदाने गजबजण्यास २०२२ वर्ष उजाडावे लागले आणि मधली दोन वर्षे खंड नव्हताच, अशाच पद्धतीने यश खेळू लागला. पुणे जिल्ह्याकडून पुरुष संघात त्याला पहिल्यांदाच संधी मिळाली. त्याचे सोने करीत ठाण्याच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून M. com . करीत असल्याने त्याची विद्यापीठाच्या संघात निवड झाली. पश्चिम विभागीय विद्यापीठ स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले. त्यामुळे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ (चंडीगड) व खेलो इंडिया (बंगलोर) स्पर्धांसाठी त्याची निवड झाली. बुलडाण्यातील वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरीत यशला उपविजेतेपद मिळाले. नागपूर येथील महामेट्रो इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेत तो मिश्र दुहेरीमध्ये खेळला.
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिकमध्ये (२०२३) सुवर्णपदक विजेत्या संघात यशचा वाटा मोठा होता. दुहेरीमध्ये त्याने कांस्यपदक जिंकले. लखनौमध्ये होणाऱ्या विद्यापीठस्तर खेलो इंडिया स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
सतत बॅडमिंटनचाच विचार करणाऱ्या यशचे स्वप्न आहे भारताकडून खेळण्याचे. या स्वप्नाला तो अथक मेहनतीची व सरावाची जोड देत आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी तो सकाळी सहा वाजता मैदानावर हजर असतो. दर एक दिवसाआड जिम्नॅशियममध्ये दीड तास घाम गाळतो. बॅडमिंटन कोर्टवर त्याचा तीन ते चार तास सराव चालतो. त्यामुळेच महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेने इंडोनेशियातील तीन आठवड्यांच्या विशेष प्रशिक्षणासाठी त्याची निवड केली होती. खेळाबरोबरच शिक्षणातही त्याला गती आहे. अहमदनगर महाविद्यालयातून बी. बी. ए. पदवी मिळवल्यानंतर तो साताऱ्याच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातून M. com . करीत आहे. ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला आहे. बॅडमिंटनच्या क्षितिजावरचा हा नवा तारा नगरचे नाव चमकवणार, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.