संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापना दिनिमित्त शनिवारी दि. ३ डिसेंबर रोजी अहमदनगरमध्ये पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषद, अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि डिजिटल मीडिया परिषद यांच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी दिली.
पत्रकारांची मातृ संस्था असलेल्या परिषदेची स्थापना ३ डिसेंबर १९३९ रोजी मुंबईत झाली. गेल्या दहा वर्षांपासून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या संकल्पनेतून दरवर्षी या दिवशी राज्यभर पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येते. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे आणि नवीन कार्यकारिणीने याही वर्षी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार अहमदनगरमध्येही हे शिबीर होत आहे.
येथील अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळी १०.३० वाजता हे शिबीर होणार असून यामध्ये पत्रकारांच्या आवश्यक त्या आरोग्यविषयक तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे उपस्थित राहणार आहेत. अरुणोदय हॉस्पिटलचे संचालक डॉ. शशिकांत फाटके, डॉ. सौ. वंदनाताई फाटके यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टर पत्रकारांची आरोग्य तपासणी करून आरोग्य विषयक सल्ला देणार आहेत. सोबतच वृत्तपत्रांच्या कार्यालयांसाठी परिषदेतर्फे प्रथमोपचार कीट देण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अफताब शेख यांनी केले आहे.