मोहटा देवस्थान समितीची शारदीय नवरात्रोत्सवानिमित्ताने प्रशासकीय नियोजन बैठक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : मोहटा देवस्थान समितीच्या सभागृहात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त प्रमुख प्रशासकीय नियोजन बैठक झाली. या बैठकीत नवरात्रौत्सव काळात मोहाटादेवी परिसरात खाद्यपदार्थांची तपासणी, शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविणे, राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक लावणे, साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजनांची अंमलबजावणी या प्रमुख निर्णयांबरोबरच नवरात्र काळात व्हीआयपीसह महत्त्वाच्या भाविकांना गाभारा दर्शनबंदीचा निर्णय यात्रा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठक ही प्रांताधिकारी तथा नवरात्रोत्सव यात्रा समितीचे प्रशासन प्रमुख प्रसाद मते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, शेवगाव डिवायएसपी सुनील पाटील, पोनि संतोष मुटकुळे, वनविभागाचे अरुण साबळे, तालुका आरोग्य विभागाचे डॉ. भगवान दराडे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. विशाल वाघ, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, विश्वस्त डॉ. श्रीधर देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगेंसह परिवहन, वीज वितरण, अन्न व औषध प्रशासन, दारूबंदी, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पाणीपुरवठा, पाटबंधारे आदीसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
मोहटा देवस्थानच्या राज्यस्तरीय शारदीय नवरात्रौत्सव दि.३ ते १६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत होत आहे. राज्याच्या विविध भागातून नवरात्र कालावधीत सुमारे १५ लाख भाविक देवस्थानला भेट देतील असा अंदाज असल्याने प्रांताधिकाऱ्यांनी सर्वच यंत्रणांना सेवाभावीपणे गांभीर्याने काम करण्याच्या सूचना करत यात्रा कालावधीत दररोज ऑनलाईन व त्यापूर्वी दोन दिवसांआड आढावा बैठक घेऊन नियोजन पूर्ण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी विविध विभाग प्रमुखांनी यात्रेच्या दृष्टिकोनातून आढावा सादर करत उपक्रमाची माहिती दिली.
श्री.मते म्हणाले, यात्रा कालावधीत विविध स्वतंत्र वीजजोड सक्तीचे करून, आकडा टाकून वीज घेणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई व्हावी. राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिशा व सूचनादर्शक फलक त्वरित लावून बांधकाम विभागाने मोहटा गडाकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांची दुरुस्ती, काटेरी झुडपे तोडून रस्ता वाहतूक योग्य करावा. आरोग्य यंत्रणांनी कार्डियाक म्बुलन्ससह किमान ५ रुग्णवाहिका तैनात ठेवून पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. परिवहन मंडळाने विविध ठिकाणाहून बसेसचे नियोजन करताना बसच्या दुरुस्तीसाठी पाथर्डी- मोहटा मार्गावर दुरुस्ती पथक फिरत्या स्वरूपात तैनात ठेवावे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. तिसऱ्या, ५ व्या व ७ व्या माळेसह होमाच्या दिवशी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या दृष्टीने पोलीस, आरोग्य व परिवहन विभागाने नियोजन करावे. नगर परिषदेने शहरातील यात्रा मार्गावरील अतिक्रमणे हटवून पायी चालणाऱ्या भाविकांना रस्ता मोकळा ठेवावा. यंदा सुमारे २ लाख भाविक पायी चालत येतील असा अंदाज असल्याने नगर, शेवगाव, बीड, बारामती महामार्गावरून येणाऱ्या रस्त्यावर विशेषतः करंजी व माणिकदौंडी घाटात विशेष फिरती पथके पोलिसांनी तैनात ठेवावीत. मिठाई व अन्य अन्नपदार्थांबाबत नमुने तपासणी वाढवून संबंधित विभागाने विक्रेत्यांना
सूचना द्याव्यात. बाह्य वळण मार्गाची दुरुस्ती तातडीने व्हावी असा प्रयत्न सर्व बांधकाम यंत्रणांनी करावा. त्यामुळे वाहतूक कोंडीस आळा बसेल. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त त्वरित करण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घ्यावा. शहरासह देवी गडावरील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून साथ रोगांबाबत विशेष दक्षता घ्यावी. वाढीव बंदोबस्ताबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांबरोबर चर्चा केली जाईल. गाभारा दर्शन बंदीचा निर्णय यावर्षी सुद्धा लागू राहणार असून व्हीआयपींना होमकुंडा जवळ जाऊन पाद्यपूजा करता येईल. दोन्ही वेळच्या आरत्या, दानपेटी समोरील आरती कक्षातून होतील. याबाबत देवस्थान प्रशासनाने काटेकोर अंमलबजावणी करून सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन, पिण्याचे पाणी, सुरक्षा, आरोग्य सुविधा देण्याबाबत सेवाभावी पद्धतीने यंत्रणांनी काम करावे. राज्यात प्रमुख यात्रोत्सव अशी ओळख असल्याने भाविकांना सर्व प्रकारे समाधान मिळावे याची सर्वच यंत्रणांनी दक्षता घेण्याची आवश्यकता मते यांनी स्पष्ट केली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले, डॉ.श्रीधर देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. ् जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांनी आभार प्रदर्शन केले.