जिल्हा बँकामध्ये हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला?
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी- महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रात काशीएवढीच पवित्र असून, मी सहकार क्षेत्र तोडायला नाही तर सोडण्यासाठी आलो आहे, असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह म्हणत ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बँक आदर्श मानल्या जात होत्या. आज फक्त तीन बँका आहेत. हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? रिझर्व्ह बँकेने केले का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे आयोजित पहिल्या सहकार परिषद श्री शाह उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंञी राधाकृष्ण विखे पाटील, प्रा.राम शिंदे, शिवाजी कर्डीले, बबनराव पाचपुते, आमदार मोनिकाताई राजळे, स्नेहलता कोल्हे, खा.डाॅ सुजय विखे पा, आदिंसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्राचा पाया रचण्याचे काम पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी केले. मोठ्या अडचणींचा सामना करत त्यांनी ही कामे केले. त्यामुळे प्रत्येकांने ही माती आपल्या कपाळाला लावली पाहिजे. हीच भूमी सहकार क्षेत्राची काशी असल्याचे सांगत याचे श्रेय त्यांनी विखे पाटलांना दिले.
एकही साखर कारखाना खाजगी होऊ नये, यासाठी प्रयत्न करतो आहे. मी सहकारात तोडायला नाही जोडायला आलो आहे. पण राज्य सरकारने देखील राजकारणा पलीकडे जाऊन याचा विचार करावा. राज्य सरकारने संस्थांवर कोण आहेत हे बघायला हवे. मला सल्ला देण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा, मी मूक प्रेक्षक म्हणून हे बघू शकत नाही, असे अमित शहा म्हणाले. माझ्यासमोर एखादा विषय आला तर सहकारी संस्था कोण चालवत आहे, यापेक्षा कसा चालतो हे मी बघणार आहे. पण राज्य सरकारने देखील हेच करावे, असा सल्ला अमित शहा यांनी दिला. महाराष्ट्रातील सहकार मजबूत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून राज्यातील सहकार टिकवणे आणि वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अमित शाह म्हणाले.