संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई :- शासनाचे काम जनतेपर्यंत आणि जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहचवणारा दुवा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. शासन योजनांच्या अधिक व्यापक आणि गतिमान प्रसिद्धीचे काम संघटितपणे करण्याचे आवाहन नवनियुक्त माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांनी येथे केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक पदाचा कार्यभार श्रीमती जयश्री भोज यांनी दीपक कपूर यांच्याकडून आज स्वीकारला. यावेळी श्रीमती भोज यांचे श्री. कपूर यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच श्री.कपूर यांना पुष्पगुच्छ देवून निरोप देण्यात आला. यावेळी प्रभारी संचालक (वृत्त-जनसंपर्क) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रदर्शने) श्रीमती सीमा रनाळकर, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर यांचेसह विभागातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना श्रीमती भोज यांनी येत्या काळात सांघिक प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून शासन योजनांची व्यापक प्रसिद्धी करण्याच्या भावना व्यक्त केल्या.
श्री.कपूर यांनी या विभागात महासंचालक आणि सचिव म्हणून काम करताना अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, कल्पना राबवता आल्याचा आनंद व्यक्त करून सातत्याने सर्तक राहून काम करणाऱ्या या विभागाचे काम निश्चितच अतिशय महत्वपूर्ण आणि सृजनशील असल्याच्या भावना व्यक्त केल्या. श्री.कपूर यांची जलसंपदा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती झाली आहे.
महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांच्याविषयी भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००३ मधील तुकडीच्या अधिकारी असलेल्या जयश्री भोज यांनी यापूर्वी नागपूर जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यात उप विभागीय अधिकारी, नागपूर जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी, भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वर्धा येथे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी कामकाज सांभाळलेले आहे.