संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी –– तालुक्यातील चिंचपूर इजदे नजिकच्या महिंदा येथील शेकडेवस्तीवरील ओम रामकृष्णहरी मंदिरातील मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेव शास्त्री यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यानिमित्ताने त्रिदिनी सप्ताहात रामकृष्ण महाराज, रामगिरी महाराज यांनी किर्तनसेवा तर गोदावरीताई मुंडे व भगवानगडाच्या विद्यार्थ्यांनी भजनसंध्या सादर केली.
ज्ञानेश्वर महाराज भगवानगडकर यांचे काल्याचे किर्तन झाले. यावेळी महंत त्रिविंद्रानंद सरस्वती महाराज,महंत पांडुरंग महाराज, अर्जुनशास्री महाराज, बाबासाहेब बडे महाराज, अनिल वाळके महाराज, हनुमंत महाराज, शरद वारे महाराज, वेदांताचार्य रामनाथ महाराज, अंबादास महाराज खंडागळे, देवगड संस्थानचे भक्तगण यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहसा बुद्धिजीवी मंडळी ईश्वराचे अस्तित्व नाकारतात मात्र प्राध्यापक असूनही डॉ. सुभाष शेकडे सरांनी मंदिर उभारले, याबद्दल न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी गौरवोद्गार काढले. शेकडे सरांच्या या धर्मकार्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
वेदांताचार्य नारायण महाराजांनी दिलेल्या स्वप्नदृष्टांतास अनुसरुन सरांनी हे मंदिर उभारले आहे. रामकृष्णहरी या बीजमंत्राचे हे भारतखंडातील पहिलेच मंदिर आहे.
दरम्यान यावेळी चिंचपूर इजदे ते महिंदा रॅलीचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्यांनी बैलगाडीतून प्रवास केला. महिंदा, विठ्ठलवाडी,चिंचपूर इजदे ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. संतसाहित्याचे अभ्यासक प्राचार्य अनिल सहस्रबुद्धे सरांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. प्रा.डाॕ.सुभाष शेकडे सरांनी प्रास्ताविक केले तर सौ.गीता शेकडे (खेडकर)मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अहमदनगर,बीड, औरंगाबाद ,नाशिक या जिल्ह्यातील भक्तगण मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
संकलन – मुकुंद दहिफळे