संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – महावितरण कंपनीने वीज दरवाढ प्रस्ताव दाखल केलेला आहे. त्याचा असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रिज (आमी) या संघटनेच्या वतीने निषेध करून होळी करण्यात आली, तसेच राज्यातील वीजदर इतर राज्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक पातळीवर आणावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे महावितरण कंपनीचे एमआयडीसी कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, उपाध्यक्ष संजय बंदिष्टी, दिलीप अकोलकर, जयद्रथ खाकाळ, सचिन पाठक, प्रशांत विश्वासे, सुमित लोढा, मारुती लेकुरवाळे, सचिन काकड, सागर निंबाळकर, अशोक घोलप, कृष्णा नरवडे, प्रसन्ना कुलकर्णी, महेश निजंवणे, संदीप कोद्रे, महेश इंदानी, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र शुक्रे, एस. आर. गवळी, बी. एन. कराळे आदींसह उद्योजक उपस्थित होते. निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात आली असून, खासदार सुजय विखे यांना देण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत आगामी दोन वर्षांतील तुटीच्या भरपाईची मागणी केली आहे. यानुसार स्थिर, मागणी व वहन आकार या तिन्ही वाढीव मागणी असून, प्रती युनिट 2.55 नुसार वाढणार आहे. याचा सर्व बोजा ग्राहकांवर पडणार आहे. आहे तो दर कमी करून अन्य राज्यांच्या तुलनेत तो समान पातळीवर आणावा, ही आमीची मागणी आहे.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज ग्राहकांचे वीज दर व आजचा इंधन समायोजन आकार सर्वाधिक आहे. याचे अनिष्ट परिणाम राज्याच्या हित व विकासावर होणार आहे. या संदर्भातील तुलनात्मक तक्ता या निवेदनासोबत जोडण्यात आलेला आहे. या तक्त्यानुसार सध्याचा व प्रस्तावित वीज वाढीचा विचार करता तो 50% वर जात असून, हा ग्राहकांना न झेपणारा आहे. यासह निवेदनात विविध बाबींवर सखोल प्रकाश टाकण्यात आला असून, भविष्यातील अडीअडचणींबाबत उहापोह करण्यात आला आहे. या निर्णयामुळे बहुतांश उद्योजक अडचणीत येऊन उद्योगधंदे बंद पडू शकतात.
सद्य परिस्थितीत वितरण कंपनीकडे असलेल्या अतिरिक्त वीजपोटी वीज न वापरताही स्थिर आकारासाठी राज्यातील ग्राहकांना प्रति युनिट 30 पैसे भरावे लागत आहेत. राज्यात वीज उपलब्ध असूनदेखील विजेचे खांब, रोहित्रे, वाहिन्या इ. पायाभूत सुविधा व देखभाल दुरुस्तीमधील त्रुटी यामुळे राज्यात सर्वत्र वीज खंडित होत आहे. यामुळे होणारे नुकसान मोठे आहे. याचा देखील बोजा 30 पैसे प्रति युनिट ग्राहकांवर टाकला जातो. वरील सर्व बाबतीत सुधारणा झाल्यास आपोआप वीज दर खाली येऊ शकतात, असेही निवेदनात म्हटले आहे.