संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – नगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी विभागीय आयुक्तांकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समितीच्या सभागृहात ही निवडणूक होणार आहे. नुकतीच विशेष महासभेत स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी समिती सभापतीसाठी महाविकास आघाडीचे शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांनी सभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून अर्ज नगरसचिव एस.बी.तडवी यांच्याकडे दाखल केला आहे. महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, माजी स्थायी समिती सभापती कुमार वाकळे, महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, उपसभापती मीना चोपडा, नगरसेविका सुवर्णा ग्यानप्पा, सुनिता कोतकर, माजी विरोध पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक सुनील त्र्यंबके, शाम नळकांडे, अनिल बोरुडे ,विनित पाउलबुधे, मुदस्सर शेख, अमोल गाडे, संतोष गेनप्पा, संजय चोपडा आदि उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते म्हणाले, नगर शहरात महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांना गती देण्यासाठी या पदासाठी मी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याने सर्वांचा मला पाठिंबा आहे. सर्वांच्या सहकार्याने मी निवडून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.