महाराष्ट्रातील सामान्य माणूस व शेतकरी वाचला पाहिजे : शरद पवार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रश्नांची दखल घेतली नाही. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. देशाच्या भूकेचा प्रश्न सोडवणारा बळीराजा आत्महत्या करत आहे. सोयाबीनला भाव मिळत नाही. उसाची शेतीही आतबट्ट्यात आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखरेचे भाव पडले. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी एकत्र येऊन आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केली. कारण, महाराष्ट्रातील सामान्य माणूस व शेतकरी वाचला पाहिजे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापकाका ढाकणे यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथील खंडोबा माळावर आयोजित करण्यात आलेल्या सभेस संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी खा. फौजिया खान, भाकपचे राष्ट्रीय अध्यक्ष भालचंद्र कानगो, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा योगिता राजळे, खा. निलेश लंके. संदीप वर्पे, कराळे मास्तर, शिवशंकर राजळे, सुभाष लांडे, किरण शेटे, भगवान दराडे, राजेंद्र दौंड, रामराव चव्हाण, बंडू पाटील बोरुडे, सीताराम बापू बोरुडे, ऋषीकेश ढाकणे, सुभाष केकाण, गहिनीनाथ थोरे, दिनकरराव पालवे, गहिनीनाथ शिरसाठ, प्रभावती ढाकणे, विद्या गाडेकर, सुशिला मोराळे, आरती निऱ्हाळी, सपना काटे, उषा जायभाय आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव लांडे, नितीन काकडे, राजेंद्र सातपुते यांच्यासह काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
ॲड प्रतापकाका ढाकणे यांना विधानसभेत पाठवावं यासाठी मी आलो असल्याचे सांगत पवार म्हणाले, देशाची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्या हाती आहेत. त्यांची बोलण्याची भाषा एक आणि मनाचे निर्णय दुसरेच असतात. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक भाषणांतून ४०० पारचा आकडा बिंबवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता यापेक्षा कमी जागा आल्या असत्या तरीही सरकार चालवता आलं असतं. परंतु त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलायची होती. केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांच्यासह अनेकांनी त्यांच्या भाषणातून ही भूमिका मांडली. त्यामुळे भाजपा व त्यांचे सहकारी सोडून आम्ही समविचारी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली. देशाच्या घटनेला धक्का लावण्याचा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा निर्णय घेतला.
केंद्रात कृषी मंत्री म्हणून काम करत असताना, शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ७०००० कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचा उल्लेख करत पवार म्हणाले, महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी महाराष्ट्रातील प्रश्नांची दखल घेतली नाही. गेल्या काही दिवसांत शेकडो भागिनींवर अत्याचार झाले. छत्रपती शिवाजी महाराज व फुले-शाहू-आंबेडकरांच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत ही खेदाची गोष्ट आहे. शेवगाव व पाथर्डी तालुक्यांची जागरुक तालुके अशी ओळख आहे. महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याने राज्याचे हे चित्र बदलून टाकू. स्वर्गीय बबनराव ढाकणे यांच्यासोबत राज्यात व केंद्रात काम केल्याचा उल्लेख करत भाषणाच्या शेवटी त्यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. प्रताप ढाकणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भालचंद्र कानगो, खासदार निलेश लंके व कराळे मास्तर यांनीही मनोगत व्यक्त केले.