सोमराज,बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे नगरा, शंखांचा निनाद व कानिफनाथांच्या नाम जयघोषात गडावर मानाची होळी पेटविण्यात आली. होळी सणाच्या पंधरा दिवस अगोदर होळी ( भट्टीचा सण ) साजरी होणारे मढी हे देशातले एकमेव गाव आहे. यावेळी राज्याच्या विविध भागातल्या काना कोपर्यातून आलेले हजारो नाथभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
नाथांची आरती झाल्यानंतर पवित्रहोळीची पुजा करून मढी देवस्थान अध्यक्ष बबनराव मरकड आणि पुजारी यांच्या हस्ते रात्री नऊ वाजल्यानंतर होळी पेटविण्यात आली. यावेळी सरपंच संजय मरकड, देवस्थानचे सचिव विमलताई मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे, डॉ. विलास मढीकर शामराव मरकड, भगवान मरकड, नवनाथ मरकड, बी. जे मरकड, एकनाथ मरकड, भानुविलास मरकड आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळपासूनच गडावर नाथभक्तांची मोठी वर्दळ होती. मोठ्या संख्येने लागणाऱ्या गोवऱ्या दहा दिवस आधीच श्रीकानिफनाथांचे नाव घेत सर्व जाती धर्माच्या महिलांनी घरो- घरी तयार केलेल्या असतात. गोवऱ्या गावांतून वाजतगाजत गडावर सूर्यास्तापूर्वी आणत भट्टी रचण्यात आली.
साधारण पन्नास बाय पन्नास अंतरावर दहा फूट उंच अशी भट्टी रचण्यात आली होती. गावातील प्रत्येक घरातून नाथांना व होळीसाठी पुरणपोळी नैवेद्य ग्रामस्थांकडून ठेवण्यात आला. होळी भोवती आकर्षक रांगोळी व फुलांनी केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. सर्व समाजातील ग्रामस्थांना होळी रचण्याचा मान असून, नैवेद्यासाठी देवस्थान समितीकडून डाळ व गूळ देण्यात आला होता. भट्टी पेटल्यानंतर नाथांचा जयघोष करत भाविकांनी भट्टीमध्ये श्रीफळ अर्पण केले.
मढी येथील होळीच्या सणाला शेकडो वर्षांची परंपरा असून, नाथांनी समाधी घेतल्यानंतर मढी गावात या सणाला सुरुवात झाली. मढी येथील यात्रा फाल्गुन पौर्णिमेपासून ते चैत्र महिन्यात गुढी पाडव्यापर्यंत चालते. राज्यातील अठरापगड जातीचे मानकरी व भाविक येण्यास हळूहळू सुरवात होते. मढी येथील सर्व अठरा पगड जाती धर्मांचे ग्रामस्थ शेतीवाडी,करून यात्रेसाठी सज्ज राहतात. तब्बल महिनाभर श्रीक्षेत्रमढी येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेत हा यात्रोत्सव चालू असतो.
👉होळीसाठी लाकडाचा वापर नाही-
होळीत लाकूड वापरले जात नाही. शुद्ध तूप, कापूर, सुगंधी वनस्पती आणि मुख्य म्हणजे शेणाच्या गोव-या आदींच्या साहाय्याने होळी प्रज्ज्वलित केली जाते. वृक्षतोड होऊ नये, पर्यावरण रक्षण व्हावे, यासाठी होळीला शेणाच्या गोवऱ्या थापून त्याला धार्मिक महत्त्व देत हा उत्सव साजरा केला जातो.
👉सामाजिक-धार्मिक ऐक्याचे दर्शन-
जातीभेद, बाजूला ठेवत अठरा पगड जाती जमातीला सोबत घेत मढी गावाने भट्टीच्या माध्यमातून टिकविलेली प्रथा सामाजिक व धार्मिक ऐक्याचे अनोखे दर्शन घडविणारी आहे.
देशात फक्त मढीतच पंधरा दिवस अगोदर होळीचा सण साजरा होतो. सूर्योदयापूर्वी होळी शांत झाल्यावर सर्व राख गोळा करून,हीच रक्षा वर्षभर भाविकांना अंगारा, प्रसाद म्हणून दिली जाते.