संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – मढीचे सरपंचास अपात्र करण्याची मागणी करणारा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला. पाथर्डी तालुक्यातील भटक्याची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या मढी (ता. पाथर्डी) येथील सरपंच संजय बाजीराव मरकड यांना शासकीय जमिनीवर वर्ग तीन च्या मिळकतीवर अतिक्रमण केले, म्हणून अपात्र घोषित करावे, अशी मागणी करणारा अर्ज जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी नुकताच फेटाळला आहे.

याबाबत माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील मढी येथील सरपंच संजय बाजीराव मरकड यांनी इनाम वर्ग तीनच्या जमिनीवर अतिक्रमण केले, म्हणून त्यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे अपात्र करावी, अशी मागणी करणारा अर्ज डॉ. रमाकांत मरकड यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर राजेंद्र भोसले यांच्याकडे सादर केला होता. या अर्जावर जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी संजय बाजीराव मरकड यांना नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्याचे आदेशित केले होते. त्याप्रमाणे संजय मरकड यांच्यावतीने ॲड गोरक्ष पालवे यांच्यामार्फत त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे सादर केले. त्याबरोबर या प्रकरणी गटविकास अधिकारी पाथर्डी यांचेकडील अहवाल देखील मागविण्यात आला होता. त्याबरोबर सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडून देखील अहवाल मागवण्यात आला होता. सर्व कागदपत्रांचा विचार करून जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी डॉ. रमाकांत मरकड यांची मागणी फेटाळून लावून त्यांचा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे संजय बाजीराव मरकड मढीचे सरपंच म्हणून अबाधितपणे कामकाज पाहू शकणार आहेत. मढी ग्रामपंचायत पाथर्डी तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठित समजली जाते. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. संजय मरकड यांच्या वतीने ॲड गोरक्ष पालवे यांनी कामकाज पाहिले. त्यांना राजेश खळेकर, रोहित बुधवंत,बाळकृष्ण गिते, राहुल अंबरीत, गुरविंदर पंजाबी, सचिन आघाव, धनश्री खेतमाळीस यांनी सहकार्य केले.