अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भुजबळांच्या आक्रमक विधानांबाबत विचारले असता, छगन भुजबळ मागील अनेक वर्ष ओबीसी चळवळीत काम करत आहेत.
संग्राम सत्त्तेचा वृत्त्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (17 नोव्हेंबर ) अंबडमध्ये (जि. जालना ) आयोजित ओबीसी आरक्षण बचाव एल्गार परिषदेत मराठा-कुणबी आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे. भुजबळांनी या मेळाव्यात घेतलेल्या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थनही करू शकत नाही आणि भुजबळ ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्या विधानांचा विरोधही करू शकत नसल्याने पक्षाची एकप्रकारे गोची झाली आहे.
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भुजबळांच्या आक्रमक विधानांबाबत विचारले असता, छगन भुजबळ मागील अनेक वर्ष ओबीसी चळवळीत काम करत आहेत. त्या माध्यमातून ते बोलले असावेत. भुजबळ आज ओबीसी नेते म्हणून मेळाव्यात बोलले. पक्षाची ती भूमिका नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण द्यावे, असे त्यांनी सांगितले.