संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भिंगार छावणी परिषदेने आठ दिवसाच्या अंतराने पुनः दुसऱ्यांदा शुक्रवार बाजार, शिवाजी गार्डन व कॅंटॉन्मेंट लॉन या परिसरात अतिक्रमण मोहीम राबवली. मागील बऱ्याच दिवसांपासून शुक्रवार बाजार येथे बेकायदेशीरपणे टपरी टाकून व रस्ते अडवून बऱ्याच लोकांनी बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू केले होते. सदरच्या बेकायदेशीर टपऱ्या व अनियोजित बसण्यामुळे बाजार तळात वाहतुकीस व नागरिकांना भाजीपाला खरेदीस त्रास सोसावा लागत असल्याने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विक्रांत मोरे यांच्या आदेशाने अतिक्रमण विरोधी पथकाने आठ दिवसात दुसऱ्यांदा धडक मोहीम हाती घेऊन शुक्रवार, शिवाजी गार्डन व कॅंटॉन्मेंट लॉन परिसरात मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा केला. यापुढेही जर कोणी बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विक्रांत मोरे यांनी सांगितले.

या मोहीमेत छावणी परिषदेचे वरिष्ठ विभागीय अभियंता महेंद्र सोनवणी, रमेश साके, अशोक फुलसुंदर, शिशिर पाटसकर, गणेश भोर, प्रवीण बागल, सागर ठोंबरे, शाम खांदवे व सर्व अभियंता विभाग कर्मचारी यांनी यशस्वी कामगिरी केली.
