👉 मुंबईत शरद पवार व ममता बॅनर्जी या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक : बैठकीत भाजपाविरोधी असलेल्या कुणालाही एकत्र यायचे असेल, तर त्यांचे स्वागत
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई- भाजपाच्या विरोधात आहेत, ते आमच्यासोबत उभे राहून भाजपशी लढू शकतात. भाजपाविरोधी असलेल्या कुणालाही एकत्र यायचे असेल, तर त्यांचे स्वागत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान सिल्व्हर ओक अपार्टमेंटमध्ये पवार व ममता बॅनर्जी या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत सुमारे तासभर चर्चा झाली. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र व पश्चिम बंगालचे तसे जुने नाते आहे. “काल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरे व संजय राऊत यांची भेट घेतली. आज त्या राजकीय चर्चेसाठी येथे आल्या आहेत. बंगालमधील निवडणुकीच्या विजयाबाबत त्यांनी अनुभव आम्हाला सांगितले आहे, असे श्री पवार म्हणत पुढे म्हणाले की, जे भाजपाच्या विरोधात आहेत, ते आमच्यासोबत येऊन भाजपाविरोधात लढू शकतात.
दरम्यान, ममता बॅनर्जी भाजपविरोधातील आघाडीमधून काँग्रेसला वगळण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच ममतांनी राहुल गांधींवर देखील टीका केली होती. त्यामुळे तिसऱ्या आघाडीमध्ये काँग्रेसला घेणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाच आता ममतांसोबत झालेल्या बैठकीनंतर शरद पवारांनी उत्तर दिले आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशिवाय भाजपला आव्हान देण्याचा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपविरोधी असलेल्या कोणालाही एकत्र यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. आमच्यासाठी नेतृत्व हा मुद्दा नसून सक्षम पर्याय उभा करणे हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. ज्यांची मेहनत करायची तयारी आहे, सर्वांसोबत काम करायची तयारी आहे त्यांना आघाडीमध्ये सोबत घेऊन जायचे आहे”, असं पवार म्हणाले.