सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे देश भरातून आलेल्या लाखो भाविकांनी कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे कानिफनाथ महाराज की जय’ असा जयघोष करत दर्शन घेतले. भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेली श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांचा संजीवन समाधी दिवस व रंगपंचमी सणाच्या दिवशी राज्यासह शेजारील राज्यातील भाविकांचा गर्दीचा महापुर लोटला होता. यावेळी लाखो भाविकांनी कानिफनाथांचे दर्शन घेतले. कानिफनाथ महाराज की जय असा जयजयकार करत, रेवड्याची उधळन, पारंपारिक ढोल ताशा, शंख, व डफाच्या आवाजाने संपूर्ण मढी परिसर दुमदुमला होता.
होळी, रंगपंचमी व फुलोरबाग, अशा तीन टप्प्यांत मढी येथील यात्रा भरते. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतल्याने मढी यात्रेचा हा मुख्य दिवस असतो. मागील दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्यामुळे भाविकांना कानिफनाथांच्या समाधीचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र यावर्षी पहाटपासूनच मढीकडे जाणारे सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. यावेळी सर्वच रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावर्षी देवस्थान समितीने दर्शनासाठी एकेरी बारी केल्याने मुख्य मंदिरात भाविकांची गैरसोय टळली. ठिकठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेली होती. नाथांचा प्रसाद म्हणून भाविक रेवड्या नाथांच्या समाधीला वाहत होते. त्यामुळे रेवड्यांच्या बाजारात मोठी उलाढाल झालेली पाहायला मिळाली.
👉मढी येथील गाढवांचा बाजार राज्यात प्रसिद्ध असून, या बाजारात काठेवाडी व गुजरात येथील गाढवांना मोठी मागणी असते. मात्र आज प्रथमच या बाजारात पंजाब चे गाढवं दाखल झाली होती. त्यांना मागणीही मोठ्या प्रमाणात होती. एका गाढवाला सुमारे एक लाख रुपयांचा भाव मिळाला. काठेवाडी व गावरान गाढवांनाही चांगली मागणी होती.
👉यात्रेनिमित मुख्य गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता, तर आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, उपाध्यक्ष सचिन गवारे सह विश्वस्त मंडळाने केले. यावेळी पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त ठेवला होता. मढीत आता गुढीपाडव्यापर्यंत यात्रोत्सव सुरू राहणार असून रोजच भाविकांची गर्दी असते.
सर्वत्रच वाहतूक कोंडी –
जिल्ह्यातील सर्वच आगारांतून यात्रोत्सव निमित्ताने मढीला जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या.या बसची तसेच खाजगी वाहनांची मढी ते निवडुंगे व मढी ते तिसगाव मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.