प्रयत्नांची शिकस्त करा मात्र प्रताप ढाकणे यांनाच निवडून द्या : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आवाहन
हजारोंच्या उपस्थितीत शेवगाव मध्ये शिव स्वराज्य यात्रा संपन्न.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव :- सगळ्यांनी एकजूट करा, प्रयत्नांची शिकस्त करा आणि शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून ॲड. प्रताप काका ढाकणे यांनाच निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्यावतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या खंडोबा मैदान शेवगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. डॉ. निलेश लंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संभाव्य उमेदवार ॲड. प्रताप काका ढाकणे, पैठणचे मा. आ. संजय वाघचौरे, केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र झरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, शेवगावचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे, शहराध्यक्ष बाळासाहेब डाके, तालुका उपाध्यक्ष सुभाष रावजी लांडे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शेवगावचे मा. उपनगराध्यक्ष वजीर पठाण, मा. सरपंच एजाज काजी, पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष नजीर भाई शेख, गहिनीनाथ क्षिरसाठ, देवा पवार, योगेश रासने, संपत मगर, अशोकराव गायकवाड, बद्रीनाथ बरगे, श्रीकांत धुमाळ, रामराव चव्हाण, सविता भापकर, आरती निऱ्हाळी, हुमायून आतार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयंत पाटील पुढे म्हणाले की, या विधानसभेला ॲड. प्रताप ढाकणे हे नक्कीच शेवगाव पाथर्डीचे आमदार होतील आणि शेवगाव पाथर्डी तालुक्यातले सर्व प्रलंबित प्रश्न ते मार्गी लावतील कारण विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. शेवगावच्या पाणी प्रश्नावर शेरमेने मान खाली घालावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील लोकप्रतिनिधीचे शेवगावच्या जनतेच्या प्रश्नाकडे अजिबात लक्ष नाही.या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला विधानसभा निवडणुकीमध्ये किमान १० ते १५ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.
राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्यावर ८ लाख कोटी रुपयांची कर्ज झाले आहे. अशा या निष्क्रिय सरकारला जनतेने बाहेरचा रस्ता दाखवावा. महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार गेले की चार, सहा महिन्यात केंद्रातील सरकार ही जाईल असे ते म्हणाले.
ना खाऊंगा ना खाने दूंगा असे म्हणणाऱ्या या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील यांनी सोडले नाही. त्यातही भ्रष्टाचार केला. अशा या भ्रष्टाचारी सरकारला या राज्यातून हद्दपार करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
खा. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणून ते केवळ मते मिळविण्यासाठी पोकळ घोषणा करीत आहेत. व विविध योजनांच्या जाहिरातीवर २७० कोटी रुपये त्यांनी खर्च केले आहे. हा सगळा पैसा तुमच्या आमच्या खिशातला आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपले तत्व आणि निष्ठा जपली. आणि महविकास आघाडीला ४८ पैकी ३० जागा मिळवून दिल्या. त्याचीच पुनरावृत्ती आता विधानसभेत होणार आहे. त्यामुळे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातून आपण सर्वसामान्यांचे उमेदवार असलेले ॲड. प्रताप काका ढाकणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
खा. डॉ. निलेश लंके म्हणाले की, शेवगाव पाथर्डी तालुक्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न महाविकास आघाडी सरकार निश्चित सोडवणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा उमेदवार ॲड. प्रताप काका ढाकणे यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ॲड. प्रताप ढाकणे म्हणाले की, सध्याच्या सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधीने शेवगाव पाथर्डी चा विकास १० वर्षांनी मागे नेला आहे. ताजनापूर लिफ्ट योजनेचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. ग्रामीण भागामध्ये वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा देखील लोकप्रतिनिधी उपलब्ध करून देऊ शकले नाही. या भागाचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडवणारा आपल्या हक्काचा माणूस विधानसभेत पाठवा असे ते म्हणाले.
यावेळी महबूब शेख, सुनील गव्हाणे, मा.आ. संजय वाघचौरे, पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, महिला जिल्हाध्यक्षा योगिता राजळे, अमोल फडके, बंडू बोरुडे, वजीर पठाण यांची ही भाषणे झाली. माधव काटे यांनी प्रास्ताविक केले. गणेश सरोदे, अपर्णा शेळगावकर व सुरेखा वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले. हरिष भारदे यांनी आभार मानले. या सभेसाठी शेवगाव पाथर्डी मतदार संघातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी ३ वा. असलेली नियोजित सभा प्रत्यक्षात संध्याकाळी ७ वा. सुरू झाली. तरी ४ तास शेवगाव पाथर्डी चे लोक सभा मंडपात बसून होते. प्रारंभी जनार्दन बोडखे, संतोष बोरुडे, अक्षय वायकर, संजय उरशिळे यांनी उपस्थित श्रोत्यांचे मनोरंजन केले. त्यांना ढोलकी वर राजू ठोंबरे व कीबोर्डवर अल्ताफ शेख यांनी साथ दिली.