संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ः विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पोलिसांसह अन्य सरकारी वाहनांचीही तपासणी करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणुकीत राज्यातील पोलिसांच्या तसेच सरकारी वाहनांमधून पैसे नेले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर चोक्कलिंगम यांनी वाहन तपासणीबाबत जिल्हाधिकार्यांना स्पष्ट आदेश दिल्याचे सांगितले.
निवडणूक काळात सर्वच वाहनांची तपासणी करण्याचे अधिकार तपासणी पथकांना असतात. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्यानंतर सर्व जिल्हाधिकार्यांना वाहन तपासणीबाबत पुन्हा सूचना केल्याचे मुख्य निवडणूक अधिकार्यांनी सांगितले. त्यानुसार संवैधानिक पदांवरील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती वगळता सर्वांची वाहने तपासण्यात येतील. तपासणी पथके जेथे तैनात करण्यात येतात तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. जेथे रोकड पकडली जाते तेथे पोलिसांबरोबरच अन्य विभागाचे अधिकारी देखील तैनात केले जातात. ही तपासणी पारदर्शी झाली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहे. यात कुणी कुचराई केली तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात काही ठिकाणी पैसे वाटपाचे प्रकार घडत आहेत. यावर निवडणूक आयोग काय कारवाई करत आहे, असा प्रश्न विचारला असता अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी पैसे वाटपाच्या तक्रारी आल्यानंतर स्थानिक अधिकार्यांमार्फत चौकशी करून त्यावर कारवाई केली जात असल्याचे सांगितले. मात्र, आमच्याकडे तशा तक्रारी आलेल्या नाहीत.’ दादरमधील दीपोत्सवाचा खर्च मनसे उमेदवार अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. याकडे लक्ष वेधले असता, राजकीय पक्षांनी केलेल्या तक्रारीची निवडणूक निर्णय अधिकार्यांनी चौकशी केली. यात जे नियमानुसार होते ते मंजूर केले आणि नियबाह्य होते ते हटविण्यात आले. तेथे टांगलेले आकाश कंदील नियमबाह्य होते आणि हटविले आहेत, असेही कुलकर्णी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी राज्यात 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार पात्र आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 5 कोटी 22 हजार 739 तर महिला मतदारांची संख्या 4 कोटी 69 लाख 96 हजार 269 कोटी आहे. या निवडणुकीत 288 विधानसभा मतदारसंघात एकूण 7 हजार 78 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 2 हजार 938 अर्ज मागे घेण्यात आले. अर्जमाघारीनंतर 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी एक लाख 186 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. पुणे, मुंबई, ठाणे या शहरात मोठ्या गृहसंकुलांमध्ये एक हजार 181 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहे. या मतदान प्रक्रियेत दोन लाख मतदान अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले.