अहमदनगर महोत्सव 2023 चा थाटात शुभारंभ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :- पौष्टिक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन घेऊन आपला जिल्हा राज्यात तृणधान्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर रहावा अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्हृयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
न्यू आर्टस, कॉमर्स ॲड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कृषिविभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा, कृषी महोत्सव व पशुप्रदर्शन 2023 चे उदघाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. सुजय विखे आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, पद्मश्री पोपटराव पवार बबनराव पाचपुते, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कृषी उपसंचालक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे कृषी उपसंचालक (आत्मा) राजाराम गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, बदलत्या आहारामुळे शरीरास आवश्यक पोषक तत्त्वांची उणीव भरुन काढून होणाऱ्या आजारांवर मात करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पांरपरिक आहाराला चालना देवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी केंद्र शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. पौष्टिक तृणधान्य उत्पादनासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान व इतर कृषिक सहाय्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत असुन शेतकऱ्यांनी या पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढीवर अधिक भर देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर शासनाने भर दिला असून बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला एक व्यासपीठ मिळावे यादृष्टीकोनातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर महोत्सवात महिलाबचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी 300 स्टॉल उभारण्यात आले आहेत. महिलाबचतगटांनी उत्पादित केलेला माल विक्री करता यावा यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 2 कोटी रुपये खर्चून बचतगटातील महिलांना विक्रीस्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले असुन येणाऱ्या काळातही महिलांच्या सक्षमीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी सांगितले.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी जिल्हास्तरावर महिलांच्या प्रशिक्षणासाठी भवन उभारण्यात येणार आहे. या भवनातून महिलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रानुसार दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील महिलांच्या बचतगटाचा एक ब्रँड तयार करुन तो संपुर्ण देशभर नावारुपास आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, कृषी, पशु व बचतगट असे सर्वसमावेशक 570 स्टॉल असलेल्या भव्य प्रदर्शनाचे जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व्हावी यासाठी मोफत सवरुपात सर्वाधिक स्टॉल्स बचतगटांना उपलब्ध करुन देण्यात आले असुन जिल्हा वार्षिक योजनेतूनही या गटांना माल विक्री स्टॉल्स देण्यात आले आहेत. तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन या प्रदर्शनामध्ये करण्यात आले असुन जिल्हावासियांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचेही समयोचित भाषण झाले.
याप्रसंगी महिला बचतगटांच्या ई-कॅटलॉग, यशस्वी महिलांच्या यशोगाथा असलेल्या पुस्तिकेचे विमोचन, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत, स्मार्ट प्रकल्प योजनेंतर्गत, उमेदअंतर्गत बचतगटांना कर्ज, भारतीय स्टेट बँकेमार्फत स्वयंसहाय्यता गटांना, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत कर्जाच्या धनादेशाचे पालकमंत्री श्री.विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी अहमदनगर महोत्सव 2023 च्या लोगोचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री बेडेकर यांनी केले तर आभार पद्मश्री पोपटराव पवार यांनी मानले.
*पाच दिवस चालणाऱ्या जिल्हास्तरीय साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा, कृषी महोत्सव व पशू प्रदर्शन २०२३ मध्ये उमेद अभियान अंतर्गत जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता समूहानी उत्पादीत केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री तसेच खाद्य पदार्थाची विक्रीसाठी स्टॉल, कृषी विभागातर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्याच्या दृष्टीने धान्य, फळे, कृषि औजारे व कृषि निविष्ठा यांचे स्टॉल, पशुसंवर्धन विभागाचे पशु-पक्षी, पशुधन, विविध जातींची चारापिके याचे प्रदर्शनासाठी स्टॉल आणि शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम शेतकरी व नागरिकाना माहिती होण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. या प्रदर्शनात तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी, विविध बचतगटांच्या महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.