ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नाशिक –वृद्ध आई वडील पोलिस अधीक्षक कार्यालयात येतात. आपला तीस वर्षाचा तरुण मुलगा आयुष्य संपविण्याचा विचार बोलून दाखवत आहे. हताश मनाने थरथरणाऱ्या ओठावरून घरंगळणारे ते कातरणारे शब्द एकूण धिप्पाड देह यष्टी आणि पिळदार मिशीचे पोलिस अधीक्षकांचे मन क्षणभर भावुक झाले. आणि दुसऱ्याच क्षणी अंगावर असलेल्या वर्दीने कर्त्यव्याची जाणीव करून दिली.मनाने सहानुभूती दाखवता येईल, पण हताश वृद्ध आई वडिलांना न्याय द्यायचा असेल तर त्यांच्या गुन्हेगारांना गजा आड करावे लागेल. या भावनेतून त्या माता पित्याची कैफियत ऐकून घेतली. दिंडोरीच्या शिवाजी नगरमध्ये राहणारा सागर वसाळ या 30 वर्षाच्या तरुणाचे आईवडील सांगत होते.
“साहेब! आमच्या मुलाला रोलटचा नाद लागला होता. रोलेट चालवणाऱ्या काही इसमांनी त्याला पैसे कमविण्याचे अमिष दाखवून उधारीत खेळायला दिले. हा खेळ खेळने चांगले नाही ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सागरने खेळने बंद करीत असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर सागरच्या नावावर जुगारात हरलेली बरीच मोठी रक्कम काढून वसुलीसाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. वसुलीसाठी धमक्या देत असतानाच दुसऱ्या बाजूला खेळत राहिलास तर मोठी रक्कम जिंकून आमची उधारीही देशील आणि तुही पैसे कमवशील असे आमिषही दाखवले.घरी कुणाला काही कळू नये म्हणून सागर पुन्हा त्यांच्या अमिषाला बळी पडला. जिंकला मात्र नाही. हरतच गेला. त्यांची कथित उधारी वाढत गेली. सागरने खेळणे बंद केले आणि त्या रोलेट चालकांच्या धमक्या सुरु झाल्या. त्यांनी सागरवर काढलेली उधारी 75 लाखावर पोहचली.75 लाख तात्काळ दिले नाही तर मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. त्याच्या सहकाऱ्यांनीही ती माणसं गुंड प्रवृतीची आहेत. मारून टाकतील अशी भीती सागरच्या मनात निर्माण करून त्यांच्या धमक्यांना बळकटी दिली. त्यातून वैफल्यग्रस्त झालेला सागर आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहे सांगा साहेब, आम्ही काय करू.”
त्या वृद्ध आईवडिलांची कैफियत ऐकल्यानंतर सारा प्रकार पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी सागरच्या आईवडिलांना धीर देत आश्वस्त केले आणि संबंधित संशयितांवर आवश्यक त्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. दिंडोरी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात कुमार त्रंबक जाधव (वय 45), अकिल शेख (वय 36), सचिन रमेश बागुल (वय 40 सर्व रा. ओझर मिग ता. निफाड,) या तीन संशयीतांना गजाआड केले आहे. तर फरार कैलास शहा याचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्ह्याचा प्रकार व घटनेची व्याप्ती पाहता द पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.एकूणच पोलिस अधीक्षकांनी दाखवलेल्या तत्परतेने एक तरुण आत्महत्येपासून वाचला हे मात्र खरे.
📥📥📥📲
👉धमक्या येत असतील तर तात्काळ संपर्क करा : नाशिक पोलिस अधीक्षक सचिन पाटील
कुठलाही नाद भले करीत नाही. छंदातून सवय लागते. सवय व्यसन बनते. व्यसनातून लागलेली लत सर्वस्व व्यापून आयुष्य उद्वस्त करते. हा घटनाक्रम लक्षात घेतल्यास कुठलाही छंद मर्यादा ओलांडणार नाही, मन आणि शरीर छंदाच्या आहारी जाणार नाही, एव्हढे नियंत्रण मनावर हवे.दिंडोरी पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा या मानसिक संतुलनाचे उत्तम उदाहरण आहे. कुठल्याही सवेंदनशील मनाला चटका लागावा असाच हा घटनाक्रम आहे.रोलेटसारख्या भुलभूलयाच्या अमिषामागे लागून सागर सारखे अनेक तरुण आयुष्य उद्वस्त करीत आहेत याचे तोटे उद्वस्त झाल्याशिवाय लक्षात येत नाहीत. त्या तुलनेत दिंडोरीतील सागरला फार लवकर त्याचे तोटे लक्षात आले ही त्यातल्या त्यात भली बाब. उधारीत खेळायला लावून 75 लाखाची खंडणी वसूल करु पाहणाऱ्या या संशयिताच्या धमक्याबाबत पीडित युवकाच्या आईवडिलांनी केलेले आर्जव हृदय पिळवटून टाकणारे आहे. ग्रामीण पोलिस सागरच नव्हे तर जिल्ह्यातील त्या प्रत्येक फसवलेल्या आई वडिलांच्या अश्रुंची किंमत या ठगांकडून कायदेशीर मार्गाने वसूल करण्यास कटीबद्ध आहेत. कुणाचीही अशा प्रकारात फसवणूक झाली असेल, कुणाला धमक्या येत असतील, खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न होत असेल तर पोलिसांत तक्रार करा. स्थानिक पातळीवर न्याय मिळण्यास विलंब होतो आहे अशी थोडीही शंका आली तरी पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क करा. जिल्हा पोलिसांचे दरवाजे चोवीसतास आपल्यासाठी उघडे आहेत.