पैसखांब मंदिरात विद्यार्थ्यांनी केले पसायदानाचे सामुहिक वाचन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर– नेवासा येथील पैस खांब मंदिरात ज्ञानोदय इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीतील पसायदानाचे सामुहिक वाचन केले. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी वाचनाचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनाल याच्यावतीने ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या सहकाऱ्याने जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड, ज्ञानोदय विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब चौधरी, ह.भ.प. वेदांतचार्य देवीदास महाराज म्हस्के, ह.भ.प. सचिन महाराज पवार, मराठी विषयाचे अध्यापक काकासाहेब काळे, संदीप ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड म्हणाले, मराठी भाषेच्यादृष्टीने नेवासा हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना इथे केल्याने ही भूमी पवन आणि ऊर्जा देणारी आहे. आपले ज्ञान वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील पुस्तके वाचून त्यातील आशय समजून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
. देविदास जी महाराज म्हस्के यांनी अभिजात मराठी भाषेचे महत्व ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे दाखल्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. प्राचार्य रावसाहेब चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी काकासाहेब काळे, संदीप ढेरे, अनिल भणगे, जयराम कोकतरे, संजय आखाडे यांनी परिश्रम घेतले.