नाशिक विभागस्तरावरील प्रथम क्रमाकांचा ‘छत्रपती शिवाजी वनश्री पुरस्कार’ जाहीर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी – राज्य शासनाच्या २०१८ व २०१९ या वर्षासाठीच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’ ची आज घोषणा झाली. यामध्ये कोपरगांव येथील भारत सरकारचे ‘स्वच्छतादूत’ म्हणून परिचित असलेले सुशांत घोडके यांना ‘व्यक्ती’ या गटात २०१९ चा राज्यस्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा व नाशिक विभागस्तरावरील प्रथम क्रमाकांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर राहाता तालुक्यातील पुणतांबा – रस्तापूर ग्रामपंचायतीला २०१८ साठी ‘ग्रामपंचायत’ या गटात राज्यस्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा व नाशिक विभागस्तरावरील प्रथम क्रमाकांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्यातील सामाजिक वनीकरणाच्या वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना सन्मानित करण्यासाठी सन १९८८ पासून महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०११ पासून या पुरस्काराचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ असे करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार हे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र या स्वरुपात देण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील दुसऱ्या क्रमांकासाठी ७५ हजार रूपये रोख रक्कम व विभागस्तरावरील प्रथम पुरस्कारासाठी ५० हजार रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. यापैकी पुरस्कार्थीस फक्त एका पुरस्काराची रक्कम दिली जाणार आहे. विभाग स्तरावरील पुरस्काराचे वितरण १० डिसेंबर २०२२ पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते विभागस्तरावर करण्यात येणार आहे.
याबाबतचा शासन निर्णय मुख्य वनसंरक्षक डॉ.रविकिरण गोवेकर यांनी दि.१७ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केला आहे.