संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – पोलिस उपनिरीक्षक असल्याचे खोटे सांगून युवतीबरोबरच तिच्या घरच्यांचा विश्वास संपादन करून विवाह केला. विवाह झाल्यानंतर युवतीला शिवीगाळ, दमदाटी करीत मानसिक छळ करीत पैसे घेतले. अहमदनगर (सावेडी ) उपनगरामध्ये राहात असणाऱ्या पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. त्या युवतीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर या दोघांची ओळख झाली होती.
याबाबत समजलेली माहिती अशी की, युवतीची एप्रिल २०१९ मध्ये इन्स्टाग्रामवर किरण मुरलीधर घुटे (रा. पुणे, मूळ रा. देवळे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. किरण या युवकाने युवतीच्या आई-वडिलांना आपण ‘पीएसआय’ची तयारी करत आहे, असे सांगितले. युवतीच्या आई-वडिलांनीही
विश्वास ठेऊन तिचा विवाह दि. २ फेब्रुवारी २०२१ला किरणबरोबर करून दिला. विवाहनंतर दोन दिवसांमध्येच किरण हा पुणे येथे पीएसआयचे ट्रेनिंन असल्याचे सांगून निघून गेला. तो दोन महिन्यांतून एकदा तिला भेटण्यासाठी येत होता. त्याने विवाह केल्याची माहिती त्याच्या घरच्यांना दिली नव्हती. तो अहमदनगर येथे आल्यानंतर युवतीला शिवीगाळ, दमदाटी करीत, मानसिक छळ करत पैशाची मागणी करत असे.
दरम्यान, तरूणीच्या वडिलांनी एक दिवस किरणच्या वडिलांना विवाह झाल्याची माहिती दिली. परंतु यावेळी किरण याच्या विवाहबाबत आम्हाला काही एक माहिती नाही. तो पीएसआय नसून पुणे येथे एका खासगी कंपनीमध्ये काम करत असल्याचे सांगितले. ही माहिती ऐकून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर युवतीने थेट पोलिस ठाणे गाठून किरण या युवकाविरुद्ध फिर्यादी दिली. या युवतीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.