संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील एक २१ वर्षीय युवकाचा अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १८) सकाळी ११.३० च्या सुमारास स्टेट बँक चौक ते चांदणी चौकादरम्यान असणा-या वळणावर घडली. संकेत राजेंद्र डोळे (वय २१, चिंचपूर इजदे, ता. पाथर्डी हे.मु शहर टाकळी, ता. शेवगाव) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
मयत संकेत डोळे हा नगर तालुक्यातील वाळकी येथील धर्मनाथ शैक्षणिक प्रतिष्ठानच्या एन. डी. कासार फार्मसी कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. तो मंगळवारी (दि. १८) सकाळी ११.३० च्या सुमारास यामाहा कंपनीच्या एफ. झेड. मोटारसायकलवर नगरमार्गे वाळकीकडे जात असताना उड्डाणपुलावरील स्टेट बँक चौक ते चांदणी चौकादरम्यान असलेल्या वळणावर आला असता त्याचा तोल गेल्याने तो उड्डाणपुलावरून खाली पडला. त्याची दुचाकी मात्र उड्डाणपुलावरच राहिली. उड्डाणपुलावरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपस्थित नागरिकांनी उपचारासाठी त्वरीत जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.