संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. यानंतर उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीकडून बैठकांचे आयोजन होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पदाधिकारी आणि उमेदवारांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. याप्रकरणी भाजपा नेते प्रवीण दरेकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी जोरदार टीका केली आहे.
सागर भाजपा नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर यांना निकालानंतर भाजपाची रणनीती काय आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, रणनीती कशी सांगायची असते का? समजा रणनीती असेल तर ती माध्यमांसमोर थोडीच सांगणार. कारण आता आम्ही सांगितलं तर त्याचा वापर दुसरं कोणीतरी करतील. त्यामुळे रणनीती ही सांगण्यासाठी नसते, पण त्याची अंमलबजावणी झाल्यावर तुम्हाला दिसून येईल.
उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या सर्व पदाधिकार्यांना आणि उमेदवारांना सांगितलं की, लोकसभेला उत्तर पश्चिम लोकसभा जो गैरप्रकार झाला, तसा प्रकार होऊ नये म्हणून सतर्क राहा. तसेच त्या मतदारसंघात काही होत असेल आवाज उठवा, अशा सूचना दिल्या आहेत. याप्रकरणी प्रवीण दरेकर म्हणाले की, मला असं वाटतं की, त्यांना त्यांचा पराभव दिसतो आहे. पराभव दिसतो आहे, म्हणून अशाप्रकारचे रडीचे डाव खेळणं सुरू आहे. उद्या पराभव झाल्यानंतर त्याच विश्लेषण करताना त्याच ग्राऊंड आधीच करायचं, याचं महाविकास आघाडीने आधीच नियोजन केलं आहे. उदाहरण सांगायचे झाले तर रोहित पवार त्यांच्या मतदारसंघात राम शिंदे आणि निवडणूक यंत्रणेवर आगपाखड करत आहेत. याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव समोर दिसतो आहे.