नेवासा परिसरात मंदिर चोरी, घरफोडी करणारे सराईत चोरटे पकडले ; नगर एलसीबी टिम’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नेवासा परिसरात मंदिर चोरी व घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५७ हजार ५०० रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करुन ५ गुन्हे उघडकीस आणण्यात अहमदनगर एलसीबी टिम’ला यश आले आहे. आकाश ऊर्फ मलिंगा कचरु जगधने व विशाल अरुण बर्डे (दोन्ही रा. गंगानगर, ता. नेवासा) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, संदीप दरदंले, फुरकान शेख, पोकॉ किशोर शिरसाठ, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव, चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर व चापोकॉ अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१ जानेवारी २०२४ रोजी अनोळखी इसमांनी औदुंबर चौक (नेवासा खु) येथील दुर्गादेवी मंदीराचे गेटचे कुलूप तोडून मंदिरात जाऊन ११ हजार रुपये किंमतीची दानपेटी व दान पेटीतील रोख रक्कम चोरुन नेली, या, पुजारी सुभाष एकनाथ चव्हाण ( रा. नेवासा खु, ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०२/२०२४ भादविक ४५७,३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा दाखल गुन्ह्याचा समांतर तपास लावून उघडकीस आणण्याच्या एलसीबी टिम’ला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबी टिम’ने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबी टिम’ने माहिती ठिकाणी जाऊन पाहाणी करता दोन संशयीत झाडाखाली बसलेले दिसले. पोलिसांची खात्री होताच दोन्ही संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना पोलीसांची ओळख सांगून त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आकाश ऊर्फ मलिंगा कचरु जगधने (वय २२), व विशाल अरुण बर्डे (दोन्ही रा. गंगानगर, ता. नेवासा) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार फरार असणारे अमर बर्डे व बंटा ऊर्फ सौरभ (दोन्ही रा. गंगानगर, ता. नेवासा) यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये सोन्या चांदीचे दागिने, रोख व विविध कंपनीचे ४ मोबाईल फोन असा एकूण ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
ताब्यातील आरोपींकडे मुद्देमालाबाबत चौकशी करता सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देवुन लागले. परंतु पोलिस खाक्या दाखविताचा दोन्ही आरोपींनी नेवासा परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिल्याने ५ गुन्हे उघडकिस आलेले आहेत. एलसीबी टिम’ने ताब्यातील दोन्ही आरोपींना मुद्देमालासह नेवासा पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत.