संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online news
अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दैनिक नगर स्वतंत्रचे संपादक प्रा. सुभाष चिंधे यांनी निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच, अहमदनगर दक्षिणचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यासह मतदारसंघातील अन्य उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
येत्या सोमवारी (दि.30) नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत अपक्षांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यात खा.डॉ. सुजय विखे यांची असलेली ताकद सर्वश्रृत आहे. निवडणुकीपूर्वी खा. विखे यांच्या समर्थकांनी अहमदनगर, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव या पाचही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदारांची नोंदणी केली आहे.
खा. विखे यांनी प्रा. चिंधे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देतानाच कानमंत्रही दिला आहे. खा.विखे यांच्या सदिच्छा पाठिशी असल्याने आपण निवडणुकीत विजयी होऊ, असा दावा प्रा. चिंधे यांनी केला आहे. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अॅड. धनंजय जाधव, माजी नगरसेवक निखील वारे आदी उपस्थित होते.