👉अ.नगर जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे चिंचपूर पांगुळ ग्रामस्थ रघुनाथ बडे, पोपट बडे यांची तक्रार ; चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा
सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : ठेकेदार, सरपंच, कार्यकारी अभियंता, उपअभियंता,शाखा अभियंता यांनी संगनमत करून आवश्यकता नसताना पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ या गावाला जलमिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून, त्या ठिकाणी केवळ थातूरमातूर काम करुन शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा सरकारी बाबू आणि ठेकेदार महाशयांचा डाव आहे. यात एकदंरीत शासनाची घोर आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणूनच मंजूर योजना भ्रष्टाचाराच्या खाईत न लोटात, जलमिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेची चिंचपूर पांगुळ गावाला गरज आहे का? याची केंद्र अथवा राज्य पातळीवरील अधिका-यांकडून शहानिशा करावी. तसे न झाल्यास चिंचपूर पांगुळ (ता.पाथर्डी)येथील जलमिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर कामात गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे, अशी थेट तक्रार अहमदनगर जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे चिंचपूर पांगुळ येथील ग्रामस्थ रघुनाथ काशिनाथ बडे, पोपट हरिभाऊ बडे यांनी केली आहे. तक्रारीची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

योजनेच्या कामाची अंदाजित रक्कम १ कोटी ७३ लाख इतकी आहे. चिंचपूर पांगुळ हे पुनर्वसित गाव आहे. चिंचपुर पांगूळ हे गाव पुनर्वसित असल्यामुळे पाटबंधारे विभागामार्फत चिंचपूर पांगुळ येथे संपूर्ण मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पुर्नवसित गाव योजनेअंतर्गत बीड पाटबंधारे विभागामार्फत दोन विहीरी, दोन पाईपलाईन , गावातंर्गत नळ योजना असतांना आर्थिक हित डोळयासमोर ठेवले आहे. या योजनेची गावाला काहीही गरज नसतांना फक्त अपहार करण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले आहे. या योजनेसाठी दोन वेळेस पाईपलाईन दुरुस्तीसाठी निधी मिळाला आहे. ती दुरुस्ती झालेली आहे. योजना कार्यन्वीत असून जलजीवन मिशन योजनेची गावास आवश्यकता नाही. योजनेमध्ये ठेकेदाराने सरपंच कार्यकारी अभियंता, उपअभियंता,शाखा अभियंता, यांच्याशी संगनमत करून या योजनेत खूप मोठा भ्रष्टचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करण्यात यावी, तसेच या संपूर्ण योजनेची शहानिशा केल्याशिवाय ठेकेदारला बिल अदा करु नये, अशी मागणी केली आहे. परंतु प्रशासनाने तक्रारीची अथवा मागणीची दखल न घेतल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा रघुनाथ काशिनाथ बडे, पोपटराव हरिभाऊ बडे यांनी दिला आहे.
या तक्रारीमुळे चिंचपूर पांगुळ जलजीवन मिशन योजना ही खरंच गावाच्या फायद्याची आहे की, या योजनेतून काही अपवाद अधिकारी, व तत्सम पुढा-यांना आपलेच हात ओले करायचे आहेत का?, अशीही चर्चा पंचक्रोशीत सुरु झाली आहे.
📥📥📥📥📥📥
संबंधित अधिकाऱ्यांनी पाहाणी करून योजना आराखडा तयार केला ; अपहार होण्याची संबंध नाही : सरपंच सौ.प्रगती बडे पा.

गावात सुमारे १६ ते १७ वर्षापूर्वी भारत निर्माण योजने अंतर्गत नळ योजना काम झाले होते. शिवाय ते पूर्ण गावात, वस्त्यांवर झालेले नाही. हे काम २०५३पर्यंत गृहीत धरून योजना केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी रितसर पाहाणी करून योजनेचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये अपहार होण्याचा काहीही संबंध येत नाही, असे स्पष्ट चिंचपूर पांगुळच्या सरपंच सौ.प्रगती धनंजय बडे पा. यांनी केले आहे.