संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – अहमदनगर शहरांमध्ये पुलाचे काम चालू असून शहरामध्ये बाहेरगावावरून येणार्या खाजगी प्रवासी वाहतूक उड्डाणपूलाचे काम पूर्ण होईपर्यंत बाह्यवळण रस्त्याने वळविण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा सुरेखाताई सांगळे, जिल्हा सचिव गणेश गायकवाड, भिंगार शहराध्यक्ष गणेश शिंदे, तालुका उपाध्यक्ष गोरख आढाव, काका पाटील गायके, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे बाळासाहेब ढवळे, मीनाक्षी जाधव, महेमूद पठाण, किशोर शिकारे, भारत फुलमाळी, बाळासाहेब तोडमल, नितीन पोटे, उमेश कवडे आदी उपस्थित होते.
अहमदनगर शहरांमध्ये सक्करचौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणीपर्यंत पुलाचे काम चालू आहे. त्या कामामुळे विविध ठिकाणी खोदकाम करण्यात आलेले आहेत. या कामाच्या अनुषंगाने शहर वाहतूक विभागाने काही ठिकाणी वाहतूक देखील वळविलेली आहेत. मार्ग बंद करण्यात आलेले आहेत, तसेच बाहेरगावावरून येणार्या प्रवासी वाहतूक हे राजरोसपणे वाहतुकीचे सर्व नियम मोडून शहरांमध्ये पुण्याच्या काम चालू असताना त्या रस्त्यावरून जातात. तेथे सध्या ट्राफिक जाम होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये वाहकास रस्त्यावरील खड्डे पुलाच्या कामासाठी लावलेल्या बॅरिकेट याचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होऊ शकतो. यामध्ये प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वीदेखील छोटे-मोठे अपघात या ठिकाणी झालेले आहेत. या सर्व घटना होऊ नये, या अनुषंगाने शहरांमध्ये बाहेरगावावरून येणार्या प्रवासी वाहतुकीस पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत बाह्यवळण रस्त्यावरून जाण्याचे आदेश द्यावेत. शहरामध्ये ट्राफिक जाम देखील होणार नाही, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने निवेदनात केली आहे.