संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुक्ताईनगरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली, या दरम्यान त्यांनी भाजपापासून दूर गेलेले व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली.
गेल्या दोन दिवसांतील फडणवीसांच्या या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. दरम्यान, एकनाथ खडसे आणि फडणवीसांची भेट झाली नसली तरी त्यांच्या घरात जाऊन खडसेंच्या सून व भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याशी फडणवीसांनी चर्चा केली. यावेळी माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते.
👉एकदा कोविडची लढाई संपली की मग या गोष्टींमध्ये लक्ष घालू : फडणवीस
‘सध्या आपण कोविड मधून चाललो आहोत. आणि कोविडचा विषय असल्याने राजकीय सत्तांतर व बाकी सगळ्या गोष्टी याकडे आमचं कोणतंही लक्ष नाही, लक्ष देण्यासाठी आमच्याकडे वेळ देखील नाही. एकदा कोविडची लढाई संपली की मग या गोष्टींमध्ये लक्ष घालू,’ असं फडणवीस म्हणाले आहेत.
यामुळे कोरोनाची स्थिती आटोक्यात येईपर्यंत तरी महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर, भाजप नेते सत्तास्थापनेचे विविध मुहूर्त देत असतानाच खुद्द फडणवीसांनी आता कोविड लढाई संपेपर्यंत हा विषय नसल्याचे सांगितल्याने कोरोना संपल्यानंतर मात्र पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आजारपणातून बरे झाल्यानंतर राष्ट्रवादीची आज पहिलीच बैठक पार पडली आहे. या बैठकीला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांच्यासह इतर मंत्री व नेते देखील उपस्थित होते.
दरम्यान ही बैठक संपल्यानंतर नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘फडणवीसांनी पवारांशी केवळ सदिच्छा भेट घेतली. याचा सत्तांतराशी संबंध नाही. याबाबत ते अनेकदा तारीख पे तारीख देत राहिलेत. मात्र, दीड वर्ष होऊनही त्यांची भविष्यवाणी खरी ठरत नाही. त्यामुळे महाविकास आघडी सरकार ५ वर्षे पूर्ण करेल, असा आम्हाला विश्वास आहे. भाजपमधील आमदार हे पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत, त्यांना थांबवण्यासाठी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असं बोलतायत. त्यांनी अनेक दावे केले. पण त्यांना यश मिळत नाहीये,’ असं भाष्य नवाब मलिक यांनी केलं आहे.