2 लाख 15 हजार रुपये किंमतीच्या 7 दुचाकी जप्त
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : शहर परिसरात दुचाकी चोरणार्या टोळीला पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांकडून 2 लाख 15 हजार रुपये किमतीच्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध विभागाचे पोउपनि मनोज कचरे, शाहीद शेख, पोकॉ प्रमोद मधुकर लहारे, सुमित गवळी, दिपक रोहोकले, पोलीस नाईक योगेश कवाष्टे, रवि टकले, महेश बोरुडे, मुकुंद दुधाळ आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.
शहरात मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढल्याने कोतवाली पोलिसांकडून मोटारसायकल चोरांना पकडण्यासाठी शोध मोहिम आखण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोटरसायकल चोरांचा शोध घेण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक यादव यांना खबर्याकडून माहिती मिळाली होती की, मोटारसायकल चोर गणेश देविदास नल्ला हा चोरीच्या मोटारसायकलसह शहरातील आयुर्वेदीक कॉर्नर येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा लावून आरोपी गणेश देविदास नल्ला (रा. पाईप लाईन रोड, अहमदनगर) याला ताब्यात घेतले. पथकाने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता मोटारसायकल तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली. त्यासोबतच शहर व परिसरात साथीदारांच्या मदतीने चोरी केलेल्या मोटरसायकलच्या इतर गुन्ह्यांची कबुली त्याने दिली. तसेच, चोरीतील मोटरसायकल त्याच्या साथीदारांच्या मदतीने विक्री करत असल्याचे सांगितले. कोतवाली पोलिसांनी आरोपी गणेश देविदास नल्ला याला सोबत घेऊन त्याचे साथीदार आनंद अनिल काळे (वय 25 वर्षे, रा. गणेशनगर, वार्ड नं.2 ता. राहता, जि.अहमदनगर), सचिन रावसाहेत चव्हाण (वय 23 वर्षे, रा.पानेगाव, ता. घनसांगवी, जि. जालना) या दोघा आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून सात मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यांचा तपास पोलीस नाईक सलिम शेख, तानाजी पवार करत आहेत.
…………………………………
सर्च ऑपरेशनमध्ये अडकले आरोपी
शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोटरसायकल चोरांना जेरबंद करण्यासाठी कोतवाली पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबविले. पोलिसांनी राबविलेल्या सर्च ऑपरेशन मध्ये एक टोळी अडकली आहे. चोरीला गेलेल्या इतर मोटरसायकलीच्या गुन्ह्यांचाही तपास कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे.