थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार; पाथर्डी पोलिस ठाण्यातील पोकाॅ सानपसह ११ पोलिस कर्मचाऱ्यांच्या तात्काळ मुख्यालयी बदली करावी
निवडणूक आयोगाकडे आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड यांची निवेदनाद्वारे मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे व पोलीस दलातील बदली आदेशाचे पालन होऊन पाथर्डी पोलिस ठाण्यातील पो.कॉ भगवान मधुकर सानप व इतर ११ पोलीस कर्मचाऱ्यांची अहिल्यानगर मुख्यालयी बदली तात्काळ करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदनाव्दारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रति राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मादामकामा रोड मुंबई,जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर, प्रांत अधिकारी तथा शेवगाव पाथर्डी २२२ निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्य सचिव गृह विभाग मुंबई, पोलीस महासंचालक मुंबई, यांना पाठविण्यात आल्या आहेत.
श्री आव्हाड यांनी निवेदनात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुका २०२४ ते २०२८ येऊ घातल्या असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन होणे कामी निवडणूक आयोगाने कडक नियम घालून दिलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे स्थानिक राजकीय निवडणुका नि:पेक्ष वातावरणात व शांततेत पार पाडाव्या. यासाठी स्थानिक संबंध असलेले अधिकारी व कर्मचारी यांना स्थानिक कर्तव्यास नेमू नये, अथवा त्यांची स्थानिक ठिकाणी नेमणूक करू नये, असे संकेत निवडणूक आयोगाने घालून दिलेले आहे. याशिवाय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालय कक्ष आशा /९०७/४.९/पोलीस कर्मचारी/प्रशासकीय बदल्या /१९८७३/२०२४ दिनांक २१/०७/२०२४ २) आशा/१०७/४.१/सन२०२४/प्र.ब/स. नेम/कार्यमुक्त/२०२४/ अहिल्यानगर यांच्याकडील आदेशाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलिसांच्या बदल्या करण्याचे आदेश दिलेले आहेत. आदेशाचा भंग केल्यास संबधित पोलीस निरीक्षक यांच्यावर देखील कारवाई करण्याचे व वेतन रोखण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, या सर्व नियमांचे उल्लंघन करून पोलीस शिपाई पोकॉ २५६७ भगवान मधुकर सानप (नेमणूक पाथर्डी पोलीस ठाणे पत्ता हनुमान मंदिरा जवळ आनंद नगर, पाथर्डी तालुका पाथर्डी अहिल्यानगर मूळ रा. माळेगाव चकला तालुका शिरूर कासार) यांची पाथर्डी पोलीस ठाण्यात ८ वर्षा पूर्वी राजकीय दबावातून बदली करण्यात आली आहे.
पोकाॅ भगवान सानप हे पाथर्डी तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या माळेगाव चकला (ता. शिरूर कासार) या गावचे असून त्यांनी गेल्या ८ वर्षात पाथर्डी व शेवगाव परिसरात स्वतःचे राजकीय व आर्थिक प्रस्थ निर्माण केले आहे. भगवान सानप हे पाथर्डी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अवैधधंदे जसे की, बिंगो, मटका, दारू, जुगार, मावा गुटखा, खिसेकापू, रेशनमाल काळाबाजार, वाळू, ब्लास्टिंग आदी लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या करिता व स्वत: करिता हप्ते वसुली करत आहेत. या सर्व अवैध धंद्यातील हितसंबंधातून पो.कॉ. भगवान सानप यांचे राजकीय लोकांशी हितसंबंध निर्माण झाले आहे. ते अवैध धंद्यावाल्या लोकांशी व स्थानिक राजकीय पुढाऱ्यांची सलगी करून असतात. पोकाॅ सानप हे अनेक वर्षापासून पाथर्डी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्याने त्यांचे मर्जीतील राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर मतदारांना प्रभावित करण्यासाठी खोट्या पोलिसी कारवाया करण्यासाठी ते कटकारस्थान करत असतात. त्यामुळे यापूर्वी अनेक निरपराध नागरिकावर अन्याय होऊन निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाले आहेत. पोकाॅ सानप यांच्या मर्जीतील विशिष्ट राजकीय पक्षांला फायदा झालेला आहे.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे देखील पाथर्डी तालुक्याच्या लगत असलेल्या आष्टी तालुक्यातील मूळ रहिवासी आहेत. त्यांनी पोकाॅ सानप यांच्या शिवाय इतर ११ पोलीस कर्मचारी यांना बदली आदेश असताना देखील नियमबाह्यरित्या बदली ठिकाणी सोडले नाही. याशिवाय पोलीस खात्यातील नियमानुसार एखादा पोलीस कर्मचारीची सेवानिवृत्त होतानाच्या शेवटच्या ३ वर्ष कालावधीकरिता त्याच्या स्थानिक रहिवाशी तालुका पोलीस ठाण्यास नेमणूक देता येते. परंतु या सर्व नियमांचे उल्लंघन करून पाथर्डी पोलीस ठाण्यात राजकीय दबावातून पाथर्डी येथे ८ व शेवगाव येथे १० स्थानिक रहिवासी पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या. ते सध्या पाथर्डी व शेवगाव येथे कार्यरत आहेत.
याशिवाय भगवान सानप यांचे स्थानिक गुंडांशी व अवैध धंद्यावाल्यांशी हितसंबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय भगवान सानप यांनी अवैध धंदे धारकांकडून मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती कमावली आहे. भगवान सानप यांनी अवैध धंदे हप्ते वसुलीसाठी गुंड पाळले आहेत. याशिवाय भगवान सानप हे परराज्यातील अवैध कट्टे, पिस्तुल विक्री करणाऱ्या टोळीशी हितसंबंध त्यातून सानप यांनी बेहिशोबी मालमत्ता कमावली आहे. मालमत्ता त्यांनी जवळच्या नातेवाईकांच्या नावे केलेली आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत उघड चौकशी होणेसाठी मी पुराव्या निशी स्वतंत्र तक्रार करत आहे.
पोकाॅ भगवान सानप हे येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये शेवगाव पाथर्डी २२२ मतदारसंघात अथवा या रिजनमध्ये कर्तव्य बजावत राहिल्यास माझ्या पक्षाच्या अथवा मित्र पक्षाच्या उमेदवारावर अनुचित प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. पोकाॅ सानप हे नियमबाह्यरित्या पाथर्डी येथे ठाण मांडून असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच आदर्श आचारसंहितेचे भंग होत आहे. पो.कॉ. भगवान सानप यांची पाथर्डी शेवगाव रिजनमधून बदली करून मुख्यालयी तात्काळ बदली करण्यात येऊन संबधित बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली जाईल याची नोंद घ्यावी, असे म्हटले आहे.