संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : वाढत्या दुचाकी चोरी घटनांची दखल घेऊन राबविण्यात आलेल्या मोहिमेत सराईत चोरांची टोळी पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. या मोहिमेत तब्बल २३ लाख ४० हजार रुपयांच्या २४ दुचाकी हस्तगत करण्याची मोठी महत्त्वपूर्ण कामगिरी तोफखाना पोलिसांनी केली आहे.
या कारवाईत ६ बुलेट, ८ एच एफ डिलक्स, ३ स्प्लेंडर, २ पॅशन प्रो, २ पल्सर, १ ॲक्सेस, १ शाईन अशा विविध कंपनीच्या २४ दुचाकी जप्त केल्या आहेत.
एसपी राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखालील परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने व तोफखाना पो.नि मधुकर साळवे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे सपोनि नितीन रणदिवे, पोउपनि समाधान सोळंके, पोहेकॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, पोना. अविनाश वाकचौरे, धिरज खंडागळे, संदिप धामणे, वसिम पठाण, अहमद इनामदार, सचिन जगताप, सुरज वाबळे, सतिष त्रिभूवन, सतिष भवर, संदिप गिन्हे, गौतम सातपुते, दत्तात्रय कोतकर, शिरीप तरटे तसेच तांत्रिक विभाग अहमदनगर दक्षिण पो. कॉ. प्रशांत राठोड व नितीन शिंदे आदिंच्या ‘टिम’ने ही कामगिरी केली आहे.

सुमारे एक ते दिड महिन्यांपासून तोफखाना पोलीस ठाणे हद्दीमध्ये दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत होते. त्यावरुन दुचाकी चोरी करणारी टोळी तोफखाना हद्दीत सक्रिय झाल्याचा संशय निर्माण झाला. चोरटे पकडण्यासाठी सर्वच अँगलने तपास चालू होता. दुचाकी चोरी करण्यात आलेल्या ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त करुन पाहणी केली. यानंतर माहिती घेऊन सी.सी.टी.व्ही फुटेजमधील आरोपी चोरीच्या अभिलेखावरील असल्याची खात्री झाली. माहितीनुसार संशयीतावर शॅडो वॉच करण्यास सांगण्यात आलेले होते. त्याचा एक भाग म्हणून दि. ८ मे २०२३ रोजी मार्केट परिसरामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी सापळा रचला होता. त्यात एक संशयित हालचाली करताना आढळला म्हणून त्यास हटकले असता तो पळू लागला. त्याचा पाठलाग करुन पकडण्यात आले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनोज गोरख मांजरे ( वय २३, रा. शिवाजी नगर, कल्याण रोड ता. जि. अहमदनगर) असे सांगितले. त्यास पोलीस ठाण्यात आणून विश्वसात घेऊन विचारपुस करता त्याने रॉयल इन्फील्ड कंपनीच्या बुलेट दुचाकी व इतर कंपनीच्याही दुचाकी त्याच्या साथीदारांसह चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक केली व त्याने दिलेल्या माहितीवरुन त्याचे इतर साथीदार करण मनोज पवार (वय २६, रा. कॉटेज कॉर्नर, ता. जि. अहमदनगर), साहिल गफुर पठाण (वय २०, मुळ रा. सारोला आडवाई, ता- पारनेर, जि. अहमदनगर), योगेश सावळेराम मांजरे (वय २५, रा. भिस्तबाग, वैदवाडी, ता जि अहमदनगर), उमेश दिलीप गायकवाड (वय २०, रा-नाना चौक, ढवणवस्ती, पाईपलाईन रोड, अहमदनगर), शुभम अविनाश महाडुंळे ( वय २३, रा. सारोळा आडवाई, ता- पारनेर, जि. अहमदनगर) अशांची नावे सांगितली. ही सर्व साथीदारांंना मुख्य आरोपी मनोज मांजरे याच्या मदतीनेच ताब्यात घेतले. या सर्व दुचाकी चोरट्यांना तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं १९५ / २०२३ भा.दं.वि.क ३७९, ३४ प्रमाणे गुन्ह्यात अटक करण्यात आली. गुन्ह्याच्या तपासात आरोपींकडून ६ वुलेट, ८ एच एफ डिलक्स, ३ स्प्लेंडर, २ पॅशन प्रो २ पल्सर, १ ॲक्सेस, १ शाईन अशा तब्बल २४ विविध कंपनीच्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
तोफखाना पोलिसांचे नागरिकांना आवाहन
गुन्ह्याचे तपासात ज्यांनी चोरीच्या दुचाकी विकत घेतलेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेले आहे. कमी किंमतीत व विना कागदपत्रे असलेली संशयीत दुचाकी विक्री करताना आढळून आल्यास पोलीस ठाण्यास संपर्क करावा. चोरीच्या दुचाकी विकत घेऊ नये, चोरीची दुचाकी विकत घेणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची नोंद स्थानिक दुचाकी खरेदी विक्री करणारे व इतर दुकानदारांनी घ्यावी.
पोनि मधुकर साळवे
तोफखाना पोलीस स्टेशन, अहमदनगर