👉शासनाकडून जिल्हा वार्षिक योजनेसाठी 100 टक्के निधी प्राप्त. 👉जिल्हा रुग्णालयाच्या अग्नी प्रतिबंधक उपाययोजनेसाठी 2 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद. 👉बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाकरीता 7 कोटी रुपयांची तरतूद.👉ग्रामीण रस्त्यांच्या बळकटीकरणासाठी 102 कोटी रुपये मंजूर. 👉कोरोना विषयक उपाययोजनेसाठी 105 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : शासनाकडून सन 2021-22 साठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये 100 टक्के निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत सर्वसाधारण 510 कोटी, अनुसूचित जाती उपयायोजना 144 कोटी व आदिवासी उपाययोजना 46 कोटी असा एकूण 700 कोटी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेला निधी संबंधित यंत्रणांनी विविध कालमर्यादेत व मंजूर असलेल्या कामांवर खर्च करण्याचे निर्देश राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, सर्वसाधारण योजनेकरीता जिल्ह्याचा 475 कोटी नियतव्यय होता. मात्र यावर्षी वित्त मंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी जादाचे 65 कोटी वितरीत करुन सर्वसाधारण योजनेकरीता 510 कोटीं निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याला शंभर टक्के निधी प्राप्त झालेला आहे. यातील कोरोना विषयक उपाययोजनेसाठी 30 टक्के निधी खर्च करावयाचा आहे. उर्वरीत निधी खर्च करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी तात्काळ कार्यवाही करावी व वेळेत निधी खर्च करावा.
प्राथमिक शाळांच्या बांधकामासाठी शिर्डी संस्थाकडून 10 कोटी निधी प्राप्त झाला आहे. मात्र खर्चाचे अंदाजपत्रक जास्त असल्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक शाळा व अंगणवाड्यांच्या बांधकामांसाठी 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेने चांगला आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या बळकटीकरणासाठी 102 कोटीची भरीव तरतूद केली आहे. मुख्यमंत्री सडक योजनेच्या दुस-या टप्प्यात ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी भरीव तरतूद देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. अहमदनगर शहरातील बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाकरीता 7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारण खर्चात कोरोनाविषयक उपाययोजनांसाठी 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात मौजे माका (नेवासा), मौजे तिळवणी (कोपरगाव) आणि मौजे को-हाळे (राहाता) या तीन ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. जिल्ह्यात श्री जगदंबा माता मंदिर देवस्थान, ब्राम्हणगांव (कोपरगाव), श्री विठ्ठल रुख्मिणी मंदीर देवस्थान, मनोहरपूर (अकोले) व सदगुरू हरिहर सत्संग लिंगतीर्थ ट्रस्ट, इसळक (नगर) या ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली. तसेच आजपर्यंत जे प्रस्ताव प्राप्त होतील ते प्रस्ताव मंजूर करण्याचा ठराव करण्यात आला. कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, (मढी) व श्री क्षेत्र सावरगांव येथे रोप-वे उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. जिल्हा रूग्णालयात अग्नीप्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपये मंजूर करण्यात येत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी सदर निधी खर्च करण्यावर प्रशासनाने भर द्यावा. अशा सूचना ही पालकमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केल्या.
श्री. मुश्रीफ यांनी सांगितले की, प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रूग्णलयांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत नगर जिल्ह्यात 38 हजार 920 शेतकरी बाधीत झाले. त्यांना दिवाळीपूर्वी 28 कोटी 19 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. उर्वरित शेतक-यांच्या खात्यावर लवकरात लवकर मदतीची रक्कम वर्ग करण्यात येईल.
👉आग दुर्घटना चौकशी अहवाल सात दिवसाच्या आत देण्याचे निर्देश
जिल्हा रुग्णालयास लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. दुर्घटनेच्या वेळीचे सीसीटीव्ही चित्रफीती तपासण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. 7 दिवसांच्या आत चौकशीचे अहवाल सादर करण्याचे विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आला आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर दोषी व्यक्तींवर कार्यवाही करण्यात येईल. यावेळी दुर्घटनेत मृत्यु झालेल्या पारनेर येथील एका रुग्णांच्या नातेवाईकास मदतीचा धनादेश पालकमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते देण्यात आला.
बैठकीपूर्वी, अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या घटनेत मृत्यु झालेल्या 11 रुग्णांना तसेच काही दिवसांपूर्वी मृत्यु झालेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या बैठकीला विधानपरिषद आमदार किशोर दराडे, आमदार संग्राम जगताप, मोनिकाताई राजळे, रोहित पवार, लहु कानडे, आशुतोष काळे, निलेश लंके, किरण लहामटे तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच सर्व विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.