जिल्ह्यातून सक्षम लोकप्रतिनिधी पाठवायचे, अडचणी खूप असून, उमेदवारीबाबत महाविकासच्या बैठकीत चर्चा होईल : माजीमंत्री बाळासाहेब थोरात
विधानसभा उमेदवारीसाठी किरण काळे समर्थकांचे शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : जिल्ह्यातून सक्षम लोकप्रतिनिधी पाठवायचे आहेत. उमेदवारीबाबत महाविकासच्या बैठकीत चर्चा होईल. अडचणी खूप आहेत, पण त्या सोडवून जास्तीत जास्त जागा घेण्याचा माझा प्रयत्न राहील. असं म्हणत नगर शहर विधानसभेची जागा काँग्रेसकडे घेण्याचे सूचक संकेतही काॅंग्रेसचे नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरातील माऊली सभागृहात लक्ष्य विधानसभेचे – महासंकल्प मेळाव्यात
यावेळी त्यांनी दिले.
नगर शहर जिल्हा व ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या वतीने हा लक्ष्य विधानसभेचे – महासंकल्प मेळाव्यात आयोजित केला होता. यावेळी मेळाव्यास खासदार निलेश लंके, आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे दशरथ शिंदे, सुनील क्षेत्रे, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, स्वप्निल पाठक, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, उषा भगत, आशा लांडे, मिनाज सय्यद, हेमंत ओगले, कैलास शेवाळे, करण ससाणे, किरण पाटील आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री थोरात पुढे बोलताना म्हणाले, नगर शहरात काँग्रेसच्या कार्यक्रमाला माणसे उपस्थित राहणे अवघड असते. दहशत, दादागिरी, भीतीचे वातावरण असते. अशा स्थितीत आजच्या मेळाव्याला आलेले शूरवीर आहेत, असा दावा करून थोरात म्हणाले, नगर भयमुक्त करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मागील दहा वर्षात शहराची रया गेली आहे. रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. तिकडे रोज एमआयडीसीच्या घोषणा होतात, पण नगरच्या एमआयडीसीकडे दुर्लक्ष होत आहे. किरण काळे यांनी सुंदर व विकसित शहराची संकल्पना मांडली आहे. तिला ताकद द्यायची आहे. त्यामुळे परिवर्तन होणार व नगर बदलणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान यावेळी शहर विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडे घेऊन किरण काळे यांना उमेदवारी देण्याची मागणी करत काळे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
खा.डॉ. निलेश लंके म्हणाले की, लोकसभा निवडणूक काळात काँग्रेसच्या एकाही पदाधिकाऱ्यानी मला त्रास दिला नाही. उलट पदर पैसे घालून माझं काम केलं. किरण काळेंनी शहरात माझ्यासाठी खूप धडपड केली. काळेंनी शहरातील व्यथा मांडल्या. शहर विकास आराखडा मांडला. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांच्याकडे अभ्यासू आणि आक्रमक युवा नेता म्हणून पाहिले जातं. ते स्व. अनिलभैय्या राठोड यांच्यासारखेच आक्रमक आहेत. थेट भिडतात. गडी हटके आहे. माझ्यासारखाच आहे. न डगमगता पक्का भिडणारा, नडणारा आहे. कुणावर अन्याय झाला तर त्यांना सहन होत नाही, असे म्हणत किरण काळे यांचे तोंड भरून कौतुक केले.
यावेळी बोलताना किरण काळे यांनी नगर शहर विकासाचे व्हीजन मांडले. शहरात मेडिकल टुरिझम वाढवण्याचा माझा प्रयत्न असून येथे एअर ॲम्बुलन्स व एअरपोर्ट गरजेचे आहे. महापालिकेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे. नगर शहरातील तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी आयटी पार्क करिता स्पेशल इकॉनोमिक झोनला मान्यता राज्य सरकारने द्यावी म्हणून मी विद्यमान मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. मात्र त्यांचे साधे उत्तर देखील आले नाही. काही काळ थांबा. लवकरच विधानसभा होतील राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा येईल. त्यात थोरात हे मुख्यमंत्री होतील. आपण त्यांच्याकडूनच नगर शहराच्या या प्रकल्पासाठी मंजुरी आणू, असे म्हणताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाट झाला. मला मला एक संधी मिळाली तर मी शहर भयमुक्त करून विकासाच्या वाटेवर घेऊन जाईल, असे काळे म्हणाले.
यावेळी गुंदेचा, झिंजे, उबाळे, क्षेत्रे, निजाम जहागीरदार यांनी मनोगत व्यक्त करताना नगर शहराची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडे घ्यावी आणि किरण काळे यांना उमेदवारी द्यावी. शहरातील काँग्रेस कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करतील. जिल्ह्यात दोन्ही खासदार महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उबाठा गटाचे केले. काँग्रेसचा एकही खासदार झाला नाही. आता नगर शहरातून काँग्रेसचा आमदार करा. ज्याप्रमाणे सर्वसामान्य कुटुंबातील निलेश लंके यांनी विजय खेचून आणला त्याच पद्धतीने काळे यांचा देखील विजय नगरकर करतील यासाठी शहरातील पदाधिकाऱ्यांनी थोरात यांना साकडे घातले. यावेळी मेळाव्याच्या ठिकाणी आणि परिसरात थोरात यांचे भावी मुख्यमंत्री आणि काळे यांचे भावी आमदार असे फलक कार्यकर्त्यांनी झळकवले. तशी जोरदार बॅनरबाजी कार्यकर्त्यांनी केली. काळे समर्थकांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.