तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करणार – अरुण मुंडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्याचा सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वीज वितरण कंपनीकडून सुरु असलेली वीज बीलाची सक्तीची वसुली तातडीने थांबवावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करुन जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे, आ.मोनिका राजळे, माजी आ.शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब महाडिक, दिलीप भालसिंग, कचरु चोथे, प्रतिभा पाचपुते, माणिक खेडकर, मृत्यूंजय गर्जे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील प्रमुख राज्य व राष्ट्रीय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. आर्थिक झळीबरोबरच शारीरिक व्याधींनाही तोंड द्यावे लागत आहे. वेळेचाही अपव्यय होत आहे. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम सुमारे चार वर्षांपासून सुरु आहे, मात्र ज्या ठिकाणी काम झाले, तेथेही पावसामुळे खड्डे पडले आहेत. अशाच अवस्था जिल्ह्यातील इतर सर्वच महामार्गांची झाली आहे. या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली असून, त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेकांना शारीरिक अपंगत्व आले आहे.
या रस्त्यांची दुरावस्था झाल्याने सरकारच्यावतीने या रस्त्यावर मुरुम व खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते परंतु त्याचाही काही उपयोग होत नाही. त्यामुळे हे रस्ते दर्जेदार व्हावेत, यासाठी दर्जा तपासणीची स्वतंत्र्य यंत्रणा कार्यान्वित करुन हे रस्ते त्वरित डांबरीकरण करण्यात यावेत. तसेच सलग दोन वर्षांपासून कोरोना, अतिवृष्टी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असतांना सक्तीची वीज वसुली करण्यात येत आहे, ती त्वरित थांबवावी. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात लाईटचे पोल पडले आहेत, रोहित्र जळालेले आहेत, त्याची दुरुस्ती व्हावी. याबाबत नागरिक, कामगार, व्यापारी, सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट आहे. तरी तातडीने उपाययोजना न झाल्यास भाजपाच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातूतन दिला आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले, याबाबत जिल्हाधिकारी यांना एक महिन्यांपूर्वी निवेदन देण्यात आले तरीही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. आता पुढील आठ दिवसात जर रस्त्यांची दुरुस्ती, नुकसान झालेल्या शेतकर्यांचे पंचानामे करुन भरपाई न मिळाल्यास व वीज बीलाची सक्तीची वसुली न थांबल्यास जिल्हा भाजपाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उपोषण करण्यात येईल, असे सांगितले.