जिल्ह्यातील पहिल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई
होळकर कमानीच्या कामाचा शुभारंभ
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कमानीमुळे प्रेरणा मिळेल- निशांत दातीर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नामांताराच्या ठरावानंतर जिल्ह्यातील नगरमधील पहिल्या पाईपलाईन रोडवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ कमान बांधकाम कामाचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात संपन्न झाला. याप्रसंगी नामांतर रथयात्रेचे समन्वयक निशांत दातीर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पतसंस्थेचे संस्थापक भास्कर भोजने, माजी नगरसेविका शारदाताई ढवण, दिपाली बारस्कर, मीना चव्हाण, डॉ.सागर बोरुडे, रावसाहेब चव्हाण, डॉ.अशोक भोजने, रोहन ढवण, दत्ता हजारे, संदिप क्षीरसागर, ऋषी ढवण, सुभाष अबक, रविंद्र बारस्कर आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना निशांत दातीर म्हणाले, अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा चळवळीत शेवटचा टप्पा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकातून पायी रॅलीद्वारे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर 1100 ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन काढण्यात आला होता. जिल्ह्यातील समाज एकजुटीने या मोर्चात सहभागी झाला होता. नामांतर रथयात्रा चौंडी येथून तब्बल 15 दिवस प्रवास करत याच चौकात विसर्जित करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्याच्या समाज संघटनेमध्ये या चौकाचे अनन्य साधारण महत्व असून, या चौकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कमानीच्या कामामुळे जिल्ह्याला प्रेरणा मिळेल. या कामाबरोबरच चौकाचे नामकरण व ओपनस्पेसमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व सभामंडप संरक्षक भिंतीच्या कामाचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला. गेल्या 5 वर्षात या महत्वपूर्ण तीन कामांमुळे समाजाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी माजी नगरसेविका शारदाताई ढवण म्हणाले, खासदार सुजय विखे यांनी प्रभाग क्र.1 मध्ये 1 कोटी 23 लाख रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी दिला. या विकास कामांपैकी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकातील कमान व सभामंडपाचे काम पुढील अनेक वर्ष प्रेरणादायी ठरणार आहे. अनेक वर्षांपासून परिसरातील समाज बांधवांची मागणी होती. आता स्वप्नपुर्ती झाल्याचा आनंद सर्वांना झाला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषी ढवण यांनी केले तर आभार संदिप क्षीरसागर यांनी मानले.