जिल्ह्यातील अनाधिकृत जाहिरात फलक तातडीने काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर – उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्स, बॅनर्स आढळून आल्यास सार्वजनिक मालमत्ता विरूपणास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करत ते तातडीने काढून टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग, बॅनर्स, फ्लेक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत व ग्रामपंचायत हद्दीत याबाबत तातडीने कार्यवाही करावी. न्यायालयाच्या निर्णयाचे काटेकोरपणे पालन होईल यादृष्टीने संबंधित विभागांनी लक्ष द्यावे. या कामासाठी पोलीस विभागाने आवश्यक ते मनुष्यबळ पुरविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व तहसिलदार,गट विकास अधिकारी आणि नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.