जाटदेवळे, माणिकदौंडी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराची चौकशी व्हावी ; जि.प.समोर मा.सरपंच रहाटे, सदस्य पटेल यांचा बैठा सत्याग्रह
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील जाटदेवळे व माणिकदौंडी या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई व्हावी, या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर जाटदेवळे ग्रामपंचायत माजी सरपंच तथा सदस्य महादेव विश्वनाथ रहाटे व माणिकदौंडी ग्रामपंचायत सदस्य रमिज अकबर पटेल यांनी बैठा सत्याग्रह सुरू केला आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात माजी सरपंच तथा सदस्य महादेव रहाटे यांनी म्हटले की, जाटदेवळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच हे सतत गैरहजर असतात. मासिक सभा तहकूब झाल्यानंतर पुन्हा सभा घेत नाही. १५ वित्त आयोग अंतर्गत सरकारकडून आलेल्या निधीचा कोणत्याही कामासाठी वापर न करत, असल्याने तो निधी परत जाण्याची शक्यता आहे. यात आमदार निधीही पडून आहे. घरकुलचे काम न करता संपूर्ण बिले काढण्यात आली आहेत. ग्रामसेवकाची बदली झाली असताना तो एकाच ठिकाणी ठाण मांडून आहे. त्यामुळे माणिकदौंडी ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून कारवाई व्हावी, असे श्री रहाटे यांनी म्हटले आहे.
तर माणिकदौंडी ग्रामपंचायत सदस्य रमिज पटेल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, १५ वित्त आयोगातंर्गत सार्वजनिक गटारीसाठी ७ लाख रुपये मंजूर करून घेतले. ते काम हे सरपंच व ग्रामसेवक यांनीच त्यांच्या संबंधित ठेकेदारास देऊन सुरू केले आहे. ते काम ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे सुरू केले आहे. इस्टिमेटमध्ये ठरल्याप्रमाणे गटारीवर एकूण २४ चेंबर असून, त्यांनी फक्त ७ चेंबरचे काम केलेले आहे. कामे निकृष्ट असल्याबाबत पाथर्डी पंचायत समिती बीडीओ यांना समक्ष भेटून सांगितले असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. निकृष्ट दर्जाची कामे असतानाही कामांची बिले पास केली आहेत. यासह गटारीच्या कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदार, ग्रामसेवक व सरपंच यांच्या कायदेशीर कारवाई करण्यात यावी, पटेल यांनी म्हटले आहे.