👉अहमदनगर जिल्ह्यात आता मूत्रपिंड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेला परवानगी : मूत्रपिंड विकारतज्ज्ञ डॉ. साईप्रसाद शिंदे यांची माहिती
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यामुळे वेगवेगळ्या आजार उद्भवण्याची शक्यता असते. शरीरातील सर्वच अवयव महत्त्वाचे असतात. त्यात मूत्रपिंड (किडनी) शरीरातील पाणी आणि क्षारांचा समतोल राखणारा अवयव आहे. योग्य आहार-विहार नसेल तर किंवा अन्य काही कारणाने मूत्रपिंड विकार उद्भवतात. मूत्रपिंड विकारांचे निदान तसेच त्यावरील उपचार पद्धती याविषयी नऊ मार्चला जागतिक मूत्रपिंड दिवससानिमित्त जनजागृती केली जाणार आहे. त्यानुसार अहमदनगर-मनमाड रोडवरील ‘ॲपेक्स हॉस्पिटल’मध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नऊ मार्चला सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहील. या शिबिरात इतर वैद्यकीय तपासणी देखील सवलतीच्या दरात केली जाईल, अशी माहिती ॲपेक्स हॉस्पिटलचे संचालक मूत्रिपंड विकार तज्ज्ञ डॉ. साईप्रसाद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अहमदनगर जिल्ह्यात आता प्रथमच मूत्रपिंड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेला परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत आठ शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचेही डॉ. साईप्रसाद शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी किडनी रोपण झालेले रुग्ण सुरेश घाडगे यांनी आपले अनुभव सांगितले. तसेच यावेळी डॉ.गागर्डे , जनसंपर्क अधिकारी रामदास शेवाळे उपस्थित होते.
आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी होणाऱ्या मूत्रपिंड विकारांशी संबंधित असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे. त्यासाठी रुग्णांनी त्यांचे जुने रिपोर्ट घेऊन शिबिरात सहभागी होणे आवश्यक आहे. डॉ. साईप्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. धनंजय वारे, डॉ. संतोष गांगर्डे, डॉ. महेश जरे, डॉ. प्रशांत काळे, डॉ. ईश्वर कणसे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात मूत्रपिंड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या विळद घाट (ता. नगर) येथील विखे मेडिकल कॉलेजमध्ये होतात. खासदार डॉ. सुजय विखे पाटील साहेब यांनी अहमदनगरमध्ये मूत्रपिंड ट्रान्सप्लांटची परवानगी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळवली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव विळद घाट येथील विखे मेडिकल कॉलेजला अशी अवयव ट्रान्सप्लांटची परवानगी आहे. ही परवानगी मिळताच विखे मेडिकल कॉलेजमध्ये मूत्रपिंड ट्रान्सप्लांटची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया नोव्हेंबर 2021 मध्ये झाली. यानंतर सात यशस्वी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाल्या. या शस्त्रक्रिया अहमदनगरसह पुणे जिल्ह्यातील दहा निष्णात सर्जन्सच्या देखरेखीखाली होतात. त्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण 90 टक्के आहे.
मूत्रपिंड ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया अवघड असते. तशीच ती खर्चिक देखील असते. अहमदनगरमधील मूत्रपिंड विकाराचे रुग्ण हे मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे जाऊन या शस्त्रक्रिया करतात. तिथे रुग्णासोबत राहणाऱ्या नातेवाईकांचा देखील खर्च वाढतो. आता अहमदनगरमध्ये विळद घाट येथील विखे मेडिकल कॉलेजमध्ये मूत्रपिंड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया सुरू झाल्याने हा खर्च कमी होणार आहे, असे डॉ. साईप्रसाद शिंदे यांनी सांगितले.
मूत्रपिंड निकामी होण्यास मधुमेह व उच्च रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. सत्तर टक्के किडनीचे विकार हे मधुमेह व उच्च रक्तदाबामुळे होतात. त्याशिवाय संसर्ग, काही अनुवंशिक आजार, सातत्याने वेदनाशामक गोळ्यांचे सेवन यामुळे मूत्रपिंडाच्या आरोग्यावर परिणाम होतो. अहमदनगर जिल्ह्याचा विचार केल्यास लोकसंख्येच्या तुलनेत अंदाजे एक-दोन लाख मूत्रपिंड विकाराचे रुग्ण आहेत. यात सौम्य विकार असलेल्या रुग्णाचे प्रमाण यात 90 टक्के, तर डायलेसिस घेणाऱ्या रुग्णाचं प्रमाण दहा टक्के आहे. मूत्रपिंडाच्या वाढत्या आजारांमुळे या अवयवाच्या आरोग्यविषयी जनजागृती व्हावी, यासाठी अॅपेक्स हॉस्पिटलमार्फत हे शिबिर नऊ मार्चला जागतिक मूत्रपिंड (किडनी) दिवशी होत आहे. गरजू रुग्णांनी शिबिरात सहभागी व्हावे असे, आवाहन डॉ. साईप्रसाद शिंदे यांनी केले आहे.