👉श्री ढाकणे यांच्या निवडीने कोपरगावकराच्या शिरपेचात मानाचा तुरा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
कोपरगाव : राजस्थान येथील उदयपूर येथे जागतिक पाणी परिषद नुकतीच पार पडली. यावेळी परिषदेत कोपरगावचे आदिनाथ ढाकणे यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होऊन त्यांची जागतिक पाणी परिषद आयोगाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. श्री ढाकणे यांच्या निवडीमुळे कोपरगावकराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्वीडन देशात जागतिक दुष्काळ व पूर नियंत्रण परिषद स्थापित आहे. या धर्तीवर राजस्थानमधील उदयपूर येथे जागतिक पाणी परिषद आयोजित करण्यात आली होती. या पाणी परिषदेस जर्मनी, पोर्तुगील, चीन, फ्रान्स, नेपाळ, स्वीडन, स्वीझरलँड, यूएसए, इजिप्त, ब्राझील, बोन्सीया हर्जेगोविना आदी जगभरातील विविध देशाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘पाणी व दुष्काळ’ या विषयावर चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय आयोग बनवण्यात आला असून हा आयोग पाण्याबाबत जागरुकता वाढविणे, सामाजिक बांधिलकी निर्माण करत सर्वोच्च निर्णय घेण्याचा पातळीसह सर्व पातळ्यांवर गंभीर पाणी समस्याकरिता कृती करणे जसे की, कार्यक्षम, संवर्धन, संरक्षण, विकास नियोजन, व्यवस्थापन आणि पाण्याचा वापर सुलभ करत पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीच्या फायद्यासाठी पर्यावरणीय दृष्टीने टिकाऊ जलआधार निर्माण करण्यासाठी जगभरातील जल तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या उपाययोजना करणे आहे. या आतंरराष्ट्रीय पाणी आयोगात सिनेअभिनेता चिन्मय उदगीरकर, राजेश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे उगम पावणाऱ्या दक्षिणगंगा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीची गेली १९२ आठवड्यापासून सेवा करणारे स्वच्छता दूत तसेच गेल्या दोन-तीन वर्षांपासून वेगवेगळ्या पध्द्तीने जनसामान्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व पटवून देणारे तसेच ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ या संकल्पनेतून पाण्याचे महत्व पटवून देत मिळेल, त्या जागी देशी वृक्षाची लागवड व संगोपन करत एक झाड आपल्या जीवासाठी आदी वेगवेगळ्या संकल्पना राबवत जल व वृक्ष संवर्धनाची जनजागृती करणारे, अहमदनगर जिल्ह्यातील पाणी प्रश्न असेल किंवा नद्या प्रदूषण मुक्त विषायाचा वारंवार पाठपुरावा करणारे गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या या कार्याची दखल घेत उदयपूर येथे संपन्न झालेल्या जागतिक पाणी परिषदेत आतंरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंग यांनी ढाकणे यांची जागतिक पाणी आयोगाचा सदस्यपदी नियुक्ती केली आहे. या निवडीने अहमदनगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.