संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: जिल्ह्यातील जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत निविद प्रक्रियेत कार्यकारी अभियंता व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संगनमताने केलेल्या घोटाळ्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्रालयाच्या राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्य प्रकल्प संचालक सुषमा सातपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल आहेत.
नगर जिल्हा परिषदेच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 850 कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्या आहेत. या कामांच्या निविदा मंजूर करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता व घोटाळे करण्यात आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिरीश जाधव यांनी तक्रार केली होती. बीड कॅपासीटी नसताना क्षमतेपेक्षा जास्त कामे देणे, पुरेशा निविदा आलेल्या असतानाही निविदा प्रक्रिया रिव्होक करून पुन्हा निविदा मागवणे, ठराविक कामासाठी एखाद्या ठेकेदाराला अपात्र करणे व दुसऱ्या निविदेसाठी त्याला पात्र ठरवणे, बोगस वर्क डन जोडणे यावरून सर्व निविदा प्रक्रिया पूर्णपणे मॅनेज केल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केली होती. जिल्ह्यातील भाजप आमदार व त्याच्या पीएने या प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा व सुमारे 150 कोटींची कामे स्वतःच्या व इतरांच्या नावावर घेतल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तक्रारीची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता शासनाच्या पाणी व स्वच्छता मिशनच्या प्रकल्प संचालक सातपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शासन निर्णयातील तरतूदीनुसार जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जबाबदार असून, जिल्हाधिकारी हे या मिशनचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या प्रकरणी नियमानुसार चौकशी करून तातडीने अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.