सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : मी जरी अनेक वेळा पराभूत झालो असलो तरी खचलेलो नाही. माझ्या राजकीय तीस वर्षाच्या कार्यकाळात जनतेचे प्रश्न उपस्थित करत अनेक आंदोलने केली. कारण अंतःकरणात लोकांविषयी तळमळ आहे. जनतेनी जर मला विरोधक म्हणून संधी दिली आहे तर मी लोकांच्या न्याय हक्कांसाठी लढले. म्हणूनच मी ही संवाद यात्रा काढलेली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर गणातील भिलवडे येथे आयोजित गटातील कार्यकर्ता संवाद यात्रेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उबाठाशिवसेना तालुका अध्यक्ष भगवान दराडे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बाजार समितीचे माजी सभापती व गटातील संभाव्य उमेदवार गहिनाथ शिरसाठ, दिगंबर गाडे, शिवसेना नेते उद्धव दुसंग, वडगावचे सरपंच आदिनाथ बडे, बंडू पाटील बोरुडे, हुमायून आतार, सरपंच सुरेश बडे , डॉ दीपक देशमुख, पिंपळगावचे सरपंच शिरसाठ मेजर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होती.
पुढे बोलतांना प्रताप ढाकणे म्हणाले की, ज्या गोपीनाथ मुंडेंच्या नावाने मताची भीक मागितली त्यांच्या नावाने केलेले जॉगिंग पार्क हे शहरातील गटाराचे पाणी ज्या ठिकाणी वाहून जाते त्या ठिकाणी उभारण्याचे पाप आमदार यांनी केले. त्यांचा पुतळा उभा करण्यासाठी वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. मी जर तुमच्या जागेवर असतो एकट्याने सर्व खर्च केला असता.
मतदारसंघात १२०० कोटी निधी आणला आहे, असे खोटे बोलता. साधा एक रुपयाचे सुद्धा काम झालेले नाही. आम्ही तो खर्च मागितला तर दाखवत नाही. ही जनतेची दिशाभूल आहे.
माजीमंत्री बबनराव ढाकणे यांच्या कार्यकाळात ३८ तलाव आणले तुम्ही किती आणले? आरोग्य केंद्रात कर्मचारी वर्ग उपस्थित नसतात. तलाठी जागेवर नसतो. यामुळे जनतेला त्रास होतो. याची आपण आमदार म्हणून जबादारी का घेत नाहीत. प्रशासनावर तुमचा वचक राहिलेला नाही. भगवानगड व ४४ गाव पाणी पुरवठा योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी प्रयत्न केले.आणि यांनी सांगितले की, मी योजना आणली.
तुम्ही फ़क्त खोटे बोलून आमदारकी मिळवली, असं आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळून श्री ढाकणे यांनी म्हटले.
लोकशाहीमध्ये एक माणूस “शून्य”असतो,म्हणून मला तुमची साथ हवी आहे. येणाऱ्या काळात सर्व निवडणुकामध्ये महाविकास आघाडीला साथ द्या मतदारसंघातील परिस्थिती बदलवून दाखवतो, अशी ग्वाही यावेळी प्रतापकाका ढाकणे यांनी दिली.
प्रास्ताविक शिरसाठ मेजर यांनी केले. आभार पंडित बडे यांनी मानले.
दरम्यान उपस्थितीत कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील समस्या प्रतापकाका ढाकणे यांच्यासमोर मांडल्या. तसेच मागील वर्षीचे अतिवृष्टीग्रस्त अनुदान शासनाकडून आलं. परंतु चिंचपूर पांगुळ, वडगांव, ढाकणवाडी, जोगेवाडी, मानेवाडी या गावांमुद्दाम आजपर्यत वर्ग करण्यात आले नसल्याची खंतही यावेळी उद्धव केदार व परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
यावर प्रतापकाका ढाकणे यांनी येत्या ८ दिवसात तहसीलदार यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
टाकळी मानूर ते करोडी रस्ता, सिंगलफेज वीज, पिंपळगाव टप्पा ते मोहोज रस्ता, चिंचपूर इजदे ते जोगेवाडी रस्ता अश्या अनेक अडचणीचा ऊहापोह यावेळी कार्यकर्त्याकडून करण्यात आला.
या भागास सत्ताधा-यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जाते आहे. त्यामुळे इथुनपुढे प्रतापकाका ढाकणे यांच्यामागे खंबीर पणे उभा राहू अशी भावना सर्वच कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.