संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- घरफोडी करून चोरून नेलेला मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करून तो फिर्यादीस मिळवून देण्याची कामगिरी कोतवाली पोलीसांनी केली आहे. फिर्यादी गणेश रामदास लालबागे (वय ३२ वर्षे रा. दर्शनकृपा, डी-१, रेल्वे स्टेशनरोड, आनंदनगर, अहमदनगर) यांना चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाला आहे. ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि संपतराव शिंदे, पोसई मनोज महाजन, पोहेकॉ दिपक साबळे, पोना बंडू भागवत, पोकॉ ३३१ याकुब सय्यद, पोकाॅ सुमित गवळी व पोकाॅ दिपक कैतके यांनी केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, अहमदनगर येथील संतोषीमाता कॉलनी, आनंदनगर या ठिकाणी राहत्या घरातील एकूण १०.५ तोळे वजनाचे सोन्या चांदीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरटयांनी घरफोडी करून चोरून नेले, या गणेश रामदास लालबागे (वय ३२ वर्षे रा. दर्शनकृपा, डी-१, रेल्वे स्टेशनरोड, आनंदनगर, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४९९/ २०२१ भा.द.वि. कलम ४५४,३८० प्रमाणे दि. १३/०७/२०२१ रोजी १९.५३ वा अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा पुढील तपास पोनि संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मनोज महाजन हे करीत असतांना गुन्हयातील आरोपी किशोर तेजराव वायाळ (वय ४५, रा.मेरा बुद्रुक ता. चिखली जि.बुलढाणा), गोरख रघुनाथ खळेकर (वय ३४, रा. दवेळाली चौक, सातरा परिसर, औरंगाबाद मुळ रा. शिरसवाडी ता. जि.जालना) यांचा शोध घेऊन त्यांना गुन्हयात अटक करून त्यांचेकडून गुन्हयातील गेल्या मालापैकी ६.५८८ वजनाचे सोन्याचे दागिने हस्त केलेले आहेत. तसेच गुन्हयातील जप्त किंमती मुद्देमाल फिर्यादीस ताब्यात घेणेबाबत मार्गदर्शन केले.
न्यायालयातून त्याप्रमाणे मुद्देमाल फिर्यादीस ताब्यात देणेबाबतचा आदेश प्राप्त करून घेतला. आदेशात अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्रं. १२, अहमदनगर यांनी दि.१६ फेब्रुवारी २०२२ रोजी गुन्हयाचे तपासी अधिकारी, कोतवाली पोलीस ठाणे, अहमदनगर यांना जप्त किंमती मुद्देमाल फिर्यादीच्या ताब्यात देण्याबाबत आदेशित केले आहे. त्याप्रमाणे फिर्यादी यांना गुन्हयातील आरोपी याच्याकडून जप्त केलेला एकूण ६.५८८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यांचा एकूण २ लाख ७३ हजार रू किंमतीचा मुद्देमाल हा कोतवाली पोलिसांनी फिर्यादी गणेश रामदास लालबागे यांना परत दिला आहे.