चिमुकल्या हातांनी साकारला बाप्पा : पीएमश्री जि.प.प्राथमिक केंद्र शाळेमध्ये पर्यावरणपुरक गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी :- दरवर्षी मोठ्या उत्साहात व घराघरात साजरा होणारा गणपती उत्सव हा पर्यावरण पूरक असावा या उद्देशाने पर्यावरण पूरक शाडू मातीचे गणपती बनवण्यासाठीची कार्यशाळा शहरातील पीएमश्री जि.प.प्राथमिक केंद्र शाळा या शाळेमधील दोन्ही विभागात घेण्यात आली.
शहरातील श्री आनंद ग्रीन क्लब व आनंद महाविद्यालय यांच्या विद्यमाने मागील अनेक वर्षे ही कार्यशाळा शहरातील विविध शाळा व इतर ठिकाणी घेतली जाते. या कार्यशाळेत बाल चिमुकल्या मुले मुलींनी सहभागी होत मनमुराद आनंद घेत आपल्या लाडक्या बाप्पाला चिमुकल्या हातांनी साकारले. मुलांच्या संस्कारक्षम वयामध्ये जर त्यांच्यावर चांगले विचार रुजवता आले तर ते नेहमीच फायद्याचे ठरतात. शाडूची माती नैसर्गिक व पर्यावरण पूरक असल्याने यापासून बनवलेले गणपती लवकरात लवकर पाण्यामध्ये विरघळतात व पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. त्याचबरोबर कागदाचा लगदा व शाडूची माती ह्याचे गणपती हे बऱ्याच अंशी पर्यावरणासाठी फायद्याचे असतात असे कार्यशाळा प्रशिक्षक प्रा. सुर्यकांत काळोखे यांनी सांगितले.
सध्या जे आपण प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती वापरतो ते विसर्जनानंतर लवकर पाण्यात विरघळत नाहीत, त्याचबरोबर हे गणपती रंगवताना जे रासायनिक रंग वापरले जातात त्यामुळे पाण्यातील जैवविविधतेवर वाईट परिणाम होतात. म्हणून शाडू मातीचे बाप्पा घरी साकारावेत तसेच थर्माकोल किंवा प्लास्टिकचा वापर गणपती उत्सवामध्ये करू नये अशा प्रकारचे आवाहन मुलांना केले व त्याचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.
मुले गणपती बनवण्यात प्रचंड दंग झाली होती. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मुलांनी आनंद घेत मातीचे गणपती खूप सुंदर रित्या बनवले. सदर गणपती वाळल्यानंतर त्याचे सुंदर रंगकाम व मुकुट, मणी, चमकी व टिकली यांनी गणपतीची सजावट करण्यात आली.
यावेळी मुले विभाग शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा तुपे, मुली विभागाच्या मुख्याध्यापिका रत्नप्रभा महांडुळे, जयश्री काळोखे, प्रा. अजिंक्य भोर्डे तसेच स्वयंसेवक विद्यार्थी अंकुश घुले, हर्षल दराडे, अजित मरकड, प्रशांत सकुंडे, तुषार काकडे, राधेश्याम बांगर, वैष्णवी वीर, दीपाली भडके, प्रियांका लोणारे, निवेदिता भताने, प्रतीक्षा शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर हा उपक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका शोभा फुंदे, वैशाली जायभाये, सुरेखा बडे, ज्योती जाधव, मनिषा फटांगरे, भावना देवरे, शिला नागरे, भंडारी मॅडम, अनुराधा निऱ्हाळी, अर्चना खाडे, मीना ठोंगीरे यांनी परिश्रम घेतले.