👉तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : – ओढे-नाले, चाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने पाण्याचा प्रवाहाला अडकाव होतो. तेव्हा अस्तगाव मधील शेतकऱ्यांनी गाव व शिवारातील अतिक्रमण पुढील आठ दिवसात सर्वसंमतीने काढून घ्यावे. अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी येथे शेतकरी व ग्रामस्थांना दिल्या.
राहाता तालुक्यातील अस्तगाव गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची महसूलमंत्र्यांनी पाहणी केली. महसूलमंत्र्यांनी यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनील तुंबारे, राहाता मंडळाधिकारी डॉ.मोहसीन शेख, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, अस्तगावातील शेतकरी अशोक नळे ,संतोष गोर्डे ,राजेंद्र पठारे ,सतिष अत्रे ,सरपंच नवनाथ नळे ,वाल्मिक गोर्डे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतजमीनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून सोयाबीन पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
शेतात येणारा अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. चारींचा पाण्याचा प्रवाह अखंडीतपणे सुरू राहण्यासाठी चारी खोलीकरण काम करावे. अतिक्रमणे काढण्यात यावे. गावातील विहिर बुजविण्यात यावी. गावातील शाळेतील पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने लवकरात लवकर सादर करावा. अशा सूचना ही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
तात्काळ पंचनामे करावेत – महसूलमंत्री
अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, पंचनामे प्रत्यक्ष शेतात जाऊन सविस्तर, अचूक करा. शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेऊन प्रत्येक नुकसानीची तपशीलवार नोंद घ्यावी. घरांची पडझड, पशुधनाची हानी, इतर जिवीत हानी आदी पंचनाम्याची तसेच तात्काळ मदतीची प्रक्रिया पूर्ण करावी. असे निर्देश ही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, अतिवृष्टीतबाधित अस्तगाव शिवाराची पाहणी केल्यानंतर महसूलमंत्र्यांनी गावातील पाणी शिरलेल्या घरांची देखील पाहणी केली.