गडाच्या विकासासाठी आम्ही दोघं एकत्र : धनंजय मुंडे

👉भगवानगड आणि पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यातील दुरावा मिटला!
👉भाजर्डी येथील नारळी सप्ताह सोहळ्यात मुंडे बहीण-भावंडांनी घेतले महंत नामदेवशास्त्रींचे आशीर्वाद!

👉गडाविषयी चुकीचे काही बोलले असेन तर मान कापून देईन – पंकजा मुंडे-पालवे
बाळासाहेब खेडकर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बोधेगाव –
संत भगवानबाबा यांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहाच्या भाजर्डी येथील सोहळ्याला माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे-पालवे, माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे या दोघा बहीण-भावंडांनी हजेरी लावत, भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले. दोघे बहीण भावंडांसह, न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांच्यातील गेली सात वर्षे असलेले मनभेद यानिमित्ताने मिटल्याचे दिसून आले. दोघा भावंडांना अखेर गडानेच एकत्र आणल्याची प्रतिक्रिया यावेळी उमटली. राजकारणातील लढाई विचारांची आहे. पण, गडाच्या विकासासाठी आम्ही एकत्र यायचे ठरवले आहे, अशी ग्वाही आ. धनंजय मुंडे यांनी दिली. तर, मी भगवानगडाविषयी काही चुकीचे बोलले असेन तर मान कापून ठेवीन. पंकजा मुंडे जीवंत असेपर्यंत भगवानबाबांच्या गादीला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही पंकजा मुंडे-पालवे यांनी दिली. यावेळी या दोघाही भावंडांना महंत नामदेव शास्त्री यांनी आशीर्वाद देत, दोघेही मुंडे घराण्याचे आहात, दोघांचे आयुष्य चांगले आहे. मी राजकारणी नाही, साधुसंतांचा आदर ठेवा, मागे बोलू नका, असा सल्ला यावेळी दिला.


भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीत भगवानगडाचे महत्व अनन्य साधारण असे राहिले आहे. परंतु, त्यांच्या निधनानंतर पंकजा व धनंजय मुंडे या बहीण-भावात वितुष्ट आल्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगडाचा राजकीय वापर रोखला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून भगवानगडाबाबत काही टीका-टिप्पणी झाली होती. या घटनेनंतर पंकजा मुंडे ह्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे भगवानभक्ती गडावर मेळावा घेतात. तर धनंजय मुंडे हे माहूरगड येथे दर्शनाला जातात. मात्र आज सात वर्षानंतर नामदेव शास्त्री, धनंजय मुंडे, आणि पंकजा मुंडे-पालवे यांच्यात भगवानबाबा भक्तांच्या मुद्द्यावरून दिलजमाई झाल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले. याप्रसंगी शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यादेखील उपस्थित होत्या.

भाजर्डी येथील नारळी सप्ताहाला पंकजा मुंडे-पालवे, धनंजय मुंडे यांनी हजेरी लावत, महंत नामदेश शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी नामदेव शास्त्री यांच्यातील संतत्वाचे दर्शन घडले, व त्यांनी बहीण-भावातील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘मी राजकारणी नाही, तुमच्या विरोधातही नाही. मी भगवानबाबांचे स्वप्न पूर्ण करतोय. हे सर्वांचे कष्टाचे पैसे आहेत. धनंजय मुंडे यांना मी १० एक्कर जमिनीचा प्रस्ताव दिला. तो त्याने त्वरित मंजूर केला. पंकजा मुंडे यांचे आणि माझे वैर नाही, तुम्ही दोघेही मुंडे घराण्याचे आहात, दोघांचे आयुष्य चांगले आहे, साधूसंतांचा आदर ठेवा, मागे बोलू नका, हे दोघांना माझे सांगणे आहे, असे महंत नामदेव शास्त्री यांनी दोघांनाही सांगितले. याप्रसंगी आ. धनंजय मुंडे म्हणाले, की मी भगवानगडाचा खरा भक्त आहे. माझी हीच ओळख आहे. आज काहीक्षण का होईना ताई माझ्याजवळ आहे. राजकारणात आम्ही कितीही दूर असलो तरी आज जवळ आलो, आमच्यात कौटुंबिक नाते आहे. मला नियतीवर खूप विश्वास आहे, माझ्यासारखा नशीबवान मीच आहे. ताई म्हणाल्या होत्या, मी भगवानगडाची पायरी आहे तर मी त्या पायरीचा दगड आहे. माझ्या सभा मोठ्या होत नाही, मी लहान आहे, ताईंच्या सभा मोठ्या होतात. गडासाठी जी काही जबाबदारी आहे, ती आम्ही दोघे स्वीकारतो, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले. तर, पंकजा मुंडे-पालवे म्हणाल्या, की पंकजा मुंडे जीवंत असेपर्यंत भगवानबाबांच्या गादीला धक्का लागणार नाही. मी गोपीनाथ गड स्थापन केला तो महाराजांच्याहस्ते केला. नामदेव शास्त्रींना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘तुम्ही शिव्या दिल्या तरी आम्ही फुले म्हणून डोक्यावर घेऊ. तुम्ही जोड्याने मारले तरी चालेल. तुम्हाला तुमच्या बाजूच्या लोकांनी काही तरी सांगितले दिसते. मी जोरात बोलले तर अहंकार वाटत असेल, मी एक स्त्री आहे. आम्ही एकत्र येऊ नये, यासाठी लोक पाण्यात देव ठेऊन बसलेत. पण मी जर भगवानगडाविषयी बोलले तर मान कापून ठेवीन. माझ्या पर्सनॅलिटीला तुम्ही अहंकार समजू नका. धनंजय आणि माझ्यात काही नाही, तुमच्यात आणि माझ्यात काही वैर होते, हे मला माहिती नाही, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी याप्रसंगी करून दुरावा मिटल्याचे स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!