खोटी माहिती प्रसारित केलेल्या व्हॉटस्ॲप ग्रुपच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व्हॉटस्अपवरुन खोटी माहिती प्रसारित केल्याने जिल्हा ग्राहक सुरक्षा या व्हॉटस्अप ग्रुपच्या सदस्यांवर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.
एका मोबाईल क्रमांकावरुन मतदार केंद्रावर ज्याचे नाव यादीतून वगळली आहेत, म्हणजेच यादीत नावावर डिलीट शिक्का लागला आहे ते मतदार मतदान केंद्रावर फॉर्म क्र. १७ भरुन आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करुन शकणार आहेत, अशा आशयाचा संदेश व्हॉटस्अप ग्रुपवरुन प्रसारित करण्यात आला होता. निवडणुकीमध्ये अशी कोणतीही तरतूद नसल्याने निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर परिणाम करण्याचे तसेच मतदान यंत्रणेवर ताण निर्माण करण्याच्या उद्देशाने मतदारांमध्ये खोटी माहिती प्रसारित केल्यामुळे मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विकास पांडूरंग पाटील यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता सुरू असून निवडणूक प्रक्रियेबाबत कोणीही खोटी माहिती प्रसारित करू नये आणि असे संदेश अग्रेशितही करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.