खूनाच्या गुन्ह्याची १५ दिवसानंतर उकल ; अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचने आग्रा येथे जाऊन आरोपीस बेड्या ठोकल्या

खूनाच्या गुन्ह्याची १५ दिवसानंतर उकल ; अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचने आग्रा येथे जाऊन आरोपीस बेड्या ठोकल्या
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : चास शिवारात झालेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाच्या गुन्ह्याची १५ दिवसानंतर उकल झाली असून, अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचने आग्रा येथे जाऊन आरोपीस
बेड्या ठोकल्या आहेत. खुशालसिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाईठाकूर (वय 22, मुळ रा.बिजमाई, ता.जि.आग्रा, उत्तरप्रदेश) असे पकडण्यात आलेल्या आरोपीची नाव आहे.
एसपी राकेश ओला, अहिल्यानगर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि हेमंत थोरात, पोसई राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, हृदय घोडके, फुरकान शेख,विश्वास बेरड,अरूण गांगुर्डे, सागर ससाणे, सागर मिसाळ, रोहित येमुल, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे व अरूण मोरे आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी हॉटेल स्वामी समर्थ, अहिल्यानगर पुणे महामार्गावर भोयरे पठारकडे जाणारे रोडवर अनोळखी मृतदेह पडलेला असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणेस अकस्मात मृत्यू रजि.नं.१९/२०२५ प्रमाणे नोंद करण्यात आला. अकस्मात मृत्यूचा तपास व वैदयकीय अधिकारी यांनी दिलेल्या अभिप्रायावरून अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून मयताचा रूमालाने गळा आवळून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह भोयरे पठारकडे जाणारे कच्च्या रोडला टाकुन दिला.याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गुरनं ९१/२०२५ बीएनएस कलम १०३(१),२३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
एसपी राकेश ओला यांनी उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन, पोनि आहेर यांना अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले. त्यानुषंगाने अहिल्यानगर टीम नेमून गुन्ह्यातील पिडीताचा शोध घेणेबाबत सूचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. तपासी टीमने गुन्ह्याच्या घटना ठिकाणी भेट देऊन, अहिल्यानगर पुणे महामार्गावरील घटनास्थळाकडे येणारे – जाणा-या रस्त्यांवरील ४० ते ५० हॉटेल, धाबे येथील सीसीटीव्ही फुटेज चेक करून संशयीत वाहने निष्पन्न करून गुन्ह्याच्या अनुषंगाने पडताळणी केली. तपासामध्ये घटना ठिकाणपासून अहिल्यानगरच्या दिशेने ४ कि.मी.अंतरावर अपघातग्रस्त बेवारस वाहन मिळून आले. बेवारस वाहनाची माहिती प्राप्त करून त्याद्वारे दुचाकी ही सुनिल बाबुराव काळे (रा.कुंभेफळ, संभाजीनगर) हा वापरत असल्याचे निष्पन्न करून त्याच्या नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून मयत हा सुनिल बाबुराव काळे, (रा.कुंभेफळ, ता.छ.संभाजीनगर) हा असल्याची ओळख पटविली.
पथकाने मयत हा छ.संभाजीनगर येथून हॉटेल स्वामी समर्थ (चास ता.अहिल्यानगर) येथे आलेला असल्याने छ.संभाजीनगर ते चास व चास ते सुपा टोलनाका येथील हॉटेल साई दरबार पर्यतच्या महामार्गावरील १७१ सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. पथकाने सातत्याने सलग १५ दिवस तपास करून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपी खुशालसिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाईठाकूर (रा.हॉटेल साईदरबार, सुपा टोल नाका, सुपा, ता.पारनेर मुळ रा.बिजमाई ता.जि.आग्रा, उत्तरप्रदेश राज्य) यास निष्पन्न केले.
दि.२ मार्च २०२५ रोजी पथकाने आरोपी नामे खुशालसिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाईठाकूर, (वय २२, मुळ रा.बिजमाई, ता.जि.आग्रा, उत्तरप्रदेश) यांचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आग्रा, उत्तरप्रदेश राज्य येथे शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी हा हॉटेल साई दरबार येथे कामास होता. दि.१७ फेब्रुवारी २०२५ रोजी मयत हॉटेल साई दरबार ( सुपा टोलनाका, ता.पारनेर) येथे दारू पिण्यासाठी थांबलेला असताना आरोपी व मयत हे एकत्र दारू पिले. त्यावेळी मयत याने आरोपीस राहण्याकरीता रूमबाबत विचारणा केली. आरोपी हा मयतास रूम दाखविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना मयत याने दारूच्य नशेमध्ये आरोपीस शिवी दिली याचा आरोपीस राग आल्याने त्याने मयताचा रूमालाने गळा आवळून मारल्याची माहिती सांगितली.
ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस हे करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!